Join us

शिक्षकांनी दिला मराठी शाळांना पाठिंबा; विषय मराठीतून सहज समजत असल्याचे मांडले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 5:29 AM

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवले तरच पाल्याचे उज्ज्वल भवितव्य घडू शकते, अशा मानसिकतेचा परिणाम पालकांवर होऊन राज्यातील अनेक मराठी शाळा बंद पडल्या.

- सीमा महांगडेमुंबई : इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवले तरच पाल्याचे उज्ज्वल भवितव्य घडू शकते, अशा मानसिकतेचा परिणाम पालकांवर होऊन राज्यातील अनेक मराठी शाळा बंद पडल्या. मात्र मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत यासाठी समाज माध्यमातून पालकांची जनजागृती होऊ लागली आणि पालक आपल्या पाल्याला पुन्हा मराठी माध्यमांत दाखल करू लागले आहेत. मात्र मराठी शिक्षक स्वत: आपल्या पाल्यांना मराठी शाळेत टाकतात का, असा सवाल याच समाज माध्यमावर एकाने उपस्थित केला. विशेष म्हणजे या टीकेला उत्तर देण्यासाठी राज्यभरातील अनेक मराठी शिक्षक एकवटले. राज्यभरातील अनेक मराठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलांना मराठी शाळेत घातल्याचे दाखले देत प्रत्युत्तर दिले. राज्यभरातील शिक्षकांनी आपले नाव व पत्ते पोस्ट करत मराठी शाळांना पाठिंबा दिल्याची माहिती ‘मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत’ या समूहाचे प्रसाद गोखले यांनी दिली.मराठी शिक्षकांच्याच आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकविण्याच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केल्याने राज्यभरातील शिक्षकांनी आपले मराठी शाळांबद्दलचे प्रेम व्यक्त करीत प्रतिसाद दिला आहे. दोनच दिवसांत राज्याच्या विविध जिल्ह्यांतील ५० ते ६० हून अधिक शिक्षकांनी यासंदर्भात पोस्ट केल्याची माहिती गोखले यांनी दिली.मराठी ही केवळ मातृभाषा आहे आणि इंग्रजीतून शिक्षण घेतल्यावरच मुलांचे भवितव्य घडते असा उच्चभ्रू समाजात दृढ झालेला समज झिरपत समाजातील कष्टकरी समाजापर्यंत पोहोचला. मग पोटाला चिमटे काढून पालक या इंग्रजी शाळांमधील हजारो रुपयांचे शुल्क भरू लागले. आपली प्रशासकीय व्यवस्थाही याला खतपाणी घालत होती. यामुळे मराठीचे अस्तित्वच धोक्यात आले. मात्र आता पालक सजग होत आहेत आणि प्रत्येक शिक्षक हाही स्वत:च्या आयुष्यात पालक असतोच त्यामुळे मातृभाषेचे महत्त्व ते अधिक जाणतात, असे मत गोखले यांनी मांडले.इंग्रजी भाषेत संवाद, संपर्क, संज्ञापनासाठी इंग्रजी वापरताना प्रचंड गुंतागुंत, क्लिष्टतेला तोंड द्यावे लागते. बालकांच्या आकलन व अभिव्यक्ती दोन्ही बाबतींत इंग्लिशमधील गुंतागुंत व क्लिष्टतेमुळे मनावर येणारा असह्य ताण १५ वर्षांखालील विद्यार्थ्यांना खरेतर झेपणारा नसल्याचे मत पोस्ट करणाऱ्या काही मराठी शिक्षकांनी व्यक्त केले आहे. याउलट कोणताही विषय मराठीतून कमी वेळेत, सहज, सखोल समजतो तर कोणताही विषय इंग्रजीतून कळायला अधिक वेळ, अधिक कष्ट लागतात. यामुळे आम्ही प्रगतीसाठी मराठी माध्यमच वापरल्याची पोस्ट मराठी शिक्षकांनी केली.मी स्वत: शिक्षिका असून माझी मुलगी मराठी शाळेत नववीत शिकते. मात्र, ती उत्तम इंग्रजी बोलते. मराठी शाळेत शिकल्यामुळे तिला भविष्यातही कुठे अडथळा येणार नाही असेच शिक्षण तिला मिळत असल्याचे समाधान आहे. मी स्वत: मराठी शाळेत शिकले आहे. त्यामुळे मराठीत शिकल्याने शिक्षणात कुठलाही अडथळा येत नाही हे मी ठामपणे सांगू शकते.- प्राजक्ता मेहंदळे, पालक व शिक्षिका

टॅग्स :शाळा