Join us

शिक्षकांचा तास आता कोविड केअर सेंटर्सवर भरणार ... !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 5:21 PM

पालिका व अनुदानित शाळांतील शिक्षकांची माहिती संकलित करण्याच्या सूचना; संघटनांचा मात्र तीव्र विरोध

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक महापालिका शाळा व खाजगी अनुदानित शाळांमध्ये कोविड केअर सेंटर -२ उभारण्यात येत आहेत यासाठी आवश्यकतेनुसार अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असून तय्साठी अनुदानित शाळांतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती विभागीय शिक्षणाधिकारी यांच्याकडून शिक्षण विभागाने मागविली आहे. पालिका शाळांतील शिक्षकाना तर १०० उपस्थितीचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे शिक्षकांचा आणि परिणामी पुढील शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमधून येत असून याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.मुंबई विभागात शाळांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी लांब उपनगरात राहत आहेत. त्यातच अनेक ठिकाणे रेडझोन मध्ये आहेत, त्यामुळे शिक्षकांना प्रवास करणे शक्य नाही. अनेक शिक्षकांना विविध व्याधी आहेत. त्यामुळे अन्य विभागातून कोविड-१९ च्या कामासाठी कर्मचारी उपलब्ध करावे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड-१९ च्या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. आधी नाकाबंदीच्या ठिकाणी , मग मद्य विक्रीच्या दुकानांसमोर आणि आता कोविड केअर सेंटरमध्ये शिक्षकांची ड्युटी लावण्यात येत आहे. शिक्षकाना ड्युटी लावल्यावर त्यांच्या सुरक्षेचे काय ? या कामासाठी शिक्षकच का असा सवाल करत शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनीही याचा तीव्र वरोध केला आहे.आधीच शिक्षकाना पहिली ते आठवीचे निकालपत्रक वेळेत देण्याच्या सूचना आल्या आहेत. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके ही तयार करायची आहेत. हे काम संपत नाही तोवर दहावी आणि बारावीच्या निकालासाठी शिथिलता देऊन त्यांचे निकालही शिक्षण विभागाने शिक्षकांकडून वेळेत मागवले आहेत. या सगळ्यात आता कोविड केअर सेंटरवर ही शिक्षकांचीच ड्युटी लावली जाणार आहे. एवढे सगळे झाल्यावर शिक्षक विद्यार्थ्याना ज्ञानार्जन करणार की फक्त कारकुनी कामे करण्यासाठी आहे असा सवाल शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे कोरोना संदर्भात शिक्षक वर्गाने कोरोना योद्धा म्हणून काम करण्यासाठी शिक्षकांची माहिती युध्द पातळीवर संकलित करण्यात येणार आहे. शिक्षक या कामासाठी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तयार आहेत. परंतु शासनाने शिक्षकांसाठी योग्य त्या आरोग्य सुविधा व संरक्षण कवच पुरवावे. अनेक डॉक्टर, नर्स, व वैद्यकीय क्षैत्रातील कर्मचारी सेवा करताना कोरोना बाधित झाले आहेत. लोकप्रतिनिधींना देखील कोरोना झालेला या पार्श्वभूमीवर सरकारने या कामासाठी नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, वाहतूक सुविधा, तसेच संरक्षक विमा कवच देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शिक्षक उदय नरे यांनी केली आहे.  

 

टॅग्स :शिक्षण क्षेत्रकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस