लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई बँक आणि शिक्षण विभागाविरोधात जोरदार घोषणा देत शिक्षक भारती संघटनेने चेंबूर येथील उत्तर विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयावर गुरुवारी धडक दिली. शिक्षकांचे पगार मुंबई बँकेतून वितरित करण्याचे आदेश मागे घेत, राष्ट्रीयीकृत बँकेतून पगार वितरित करण्याचे आदेश शासनाने द्यावेत, अशी शिक्षक भारती संघटनेची प्रमुख मागणी होती.आंदोलनात पावसाचा व्यत्यय असतानाही, शिक्षकांनी आंदोलनाची तीव्रता कायम राखली. शिक्षकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून, २३ जून रोजी जोगेश्वरीच्या शिक्षण निरीक्षक कार्यालयात शिक्षक आंदोलन करतील, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे. मोरे म्हणाले की, त्यानंतर २७ जून रोजी परळच्या कामगार मैदानात शिक्षक आपला निषेध नोंदवतील.मुंबई बँकेतील पगाराचा निर्णय रद्द न केल्यास व रात्रशाळांतील शिक्षकांना पूर्ववत रुजू करून न घेतल्यास १ जुलै रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बोरीवली विधानसभा मतदारसंघात निदर्शने करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भ्रष्टाचाराने लडबडलेल्या आणि मुंबईबाहेर कोणत्याही सुविधा न देणाऱ्या बँकेत खाती उघडणे म्हणजे शिक्षकांचा पगार धोक्यात आणण्यासारखे असल्याचेही त्यांनी सांगतिले.
शिक्षकांची निरीक्षक कार्यालयावर धडक
By admin | Published: June 23, 2017 3:43 AM