शिक्षकामुळे शेकडोंना शिक्षणाची प्रेरणा; शिक्षक निरीक्षक कार्यालयाबाहेर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 06:01 AM2018-09-06T06:01:02+5:302018-09-06T06:01:12+5:30
नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी तसेच काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणारे दहावी किंवा बारावीच्या परीक्षांना खाजगीरीत्या दहावीची परीक्षा देत असतात. अनेकदा १७ नंबरचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात.
- सीमा महांगडे
मुंबई : नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी तसेच काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणारे दहावी किंवा बारावीच्या परीक्षांना खाजगीरीत्या दहावीची परीक्षा देत असतात. अनेकदा १७ नंबरचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. शिक्षणामध्ये अंतर पडल्याने, कागदपत्रे उपलब्ध नसल्याने शिक्षणाची इच्छा असूनही त्यांना केवळ प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. अशा लोकांसाठी या प्रश्नावर मुंबईच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शिक्षण उपनिरीक्षक अनिल गुंजाळ हे उत्तर आहेत. वयाचा विचार न करता, शिक्षणाची आवड असणाऱ्या अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला असून आतापर्यंत २५० हून अधिक जणांना त्यांनी पुन्हा शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले आहे.
विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता समजून घेऊन त्या पद्धतीने त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असते. सरकारने कोणत्याही योजना राबविण्याचा निर्णय घेतला, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते त्यामुळे शिक्षण विभागात असून शिक्षणाच्या प्रवाहात सामील होण्यास ज्याला अडचणी येत असतील त्याला मदतीचा हात देण्याला ते आपले कर्तव्य समजतात. १७ वर्षांनी काकडे नावाच्या बाईंना १७ नं चा अर्ज भरून दहावी देण्यास मदत करताना त्यांना जो आनंद झाला, तोच त्यांना १७ नं चा अर्ज भरून आज शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेऊन पारदेशात गेलेल्या विद्याथ्यार्ला पाहून होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण घेण्याची बुद्धिमत्ता असणारे अतिप्रगत विद्यार्थी, दिव्यांग, कला क्षेत्रातील विद्यार्थी, खेळाडू अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावेत यासाठी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.त्यामुळे १७ नं चा अर्जभरून त्यांना त्यामध्ये प्रवेश मिळणार असेल तर ते चांगलेच असल्याचे मत ते व्यक्त करतात.
शिक्षण विभागात काम करताना साहित्य, कला यांचा व्यासंग असलेले गुंजाळ सर सोमवार ते शुक्रवार मुंबईत काम करून शनिवार रविवार, सुट्ट्यांचं दिवशी खोडोपाड्यात विद्यार्थ्यांना व्याख्याने देतात. विशेषत: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर कौन्सिलिंग, पुढील संधी अशा विविध विषयांवर ते चर्चासत्रे घेतात. मुंबईत ही आरटीई , बालरक्षक अशा योजनांचा मूळ उद्देश पूर्ण व्हावा या दृष्टीने ते प्रयत्नशील असल्याचे त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी स्वत: सांगतात. त्यांच्यामुळे आम्हाला काम करण्याची स्फूर्ती आणि उत्साह मिळत असल्याचे मुंबई उपसंचालक कार्यालयातील अधिकारी सांगतात.
शिक्षक निरीक्षक कार्यालयाबाहेर निदर्शने
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरले. कृती समितीतर्फे राज्यभरात विनाअनुदानित शाळा बंद ठेवून शिक्षकांनी महाआरती करून शासनाचा अनोख्या प्रकारे निषेध नोंदविला. मुंबईत पश्चिम शिक्षक निरीक्षक कार्यालयाच्या बाहेर निदर्शने केल्यानंतर शिक्षक निरीक्षकांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
सोशल मीडियावर टीचर्स डे साजरा; गूगलवर विशेष डूडल
शिक्षक दिनानिमित्त बुधवारी सोशल मीडियावर शिक्षकांचे फोटो किंवा शिक्षकांसोबतचे फोटो पोस्ट करून सोशल ‘टीचर्स डे’ साजरा करण्यात आला. गूगलने शिक्षक दिनानिमित्त विशेष डूडल ठेवले होते. गूगलवर खेळ, विज्ञान-तंत्रज्ञान, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, संगीत कला, पेंटिंग, गणित या विषयावराचे चित्र डूडलमध्ये होते. डूडलद्वारे शिक्षक हे संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करत आहेत. संपूर्ण जगावर शिक्षकाचे वलय असल्याचे दाखविण्यात आले, तसेच संपूर्ण पृथ्वीवर होणाºया घटनेची माहिती शिक्षकांकडून मिळत असते, असाच संदेश गूगलच्या डूडलवरून मिळत होता.
मुंबईच्या पश्चिम शिक्षक निरीक्षक कार्यालयाबाहेर बुधवारी शिक्षकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर शासनाची महाआरती करून सर्व आंदोलनकर्त्यांनी शासनाचा निषेध केला. मागण्यांचे निवेदन निरीक्षक अनिल साबळे यांना दिले.
विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. मुंबई व कोकण विभागातून अशी २५ हजार पत्रे जाणार आहेत.