सोमय्या महाविद्यालयात शिक्षकांचे रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 02:35 AM2017-09-22T02:35:11+5:302017-09-22T02:35:14+5:30
सोमय्या महाविद्यालयातील शिक्षकांनी मराठी विषयाच्या गळचेपीविरोधात गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन केले. या वेळी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली या शिक्षकांनी महाविद्यालयासमोर धरणे देत मराठीच्या शिक्षिकेला सेवेत घेण्याची मागणी केली.
मुंबई : सोमय्या महाविद्यालयातील शिक्षकांनी मराठी विषयाच्या गळचेपीविरोधात गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन केले. या वेळी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली या शिक्षकांनी महाविद्यालयासमोर धरणे देत मराठीच्या शिक्षिकेला सेवेत घेण्याची मागणी केली.
सोमय्या महाविद्यालयातील मराठी विषय बंद करण्याविरोधात शिक्षक संघटनेला गुरुवारी आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. देशमुख म्हणाले की, सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मनमानी पद्धतीने मराठी विषय बंद केला आहे. शिक्षण उपसंचालक यांनी सुधारित संच मान्यतेत संबंधित शिक्षिकेला पूर्णवेळ कार्यभार असल्याचे व त्यानुसार त्यांना सेवा सातत्य देण्याचे सांगितले आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत प्राचार्य संबंधित शिक्षिकेला सेवेत घेत नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
देशमुख यांनी केलेल्या आरोपानुसार, प्राचार्यांकडून या वर्षी मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांवर दबाव आणून इतर विषय घेण्याची सक्ती केली जात आहे. राज्याचे अनुदान लाटून राज्यभाषा बंद करण्याचे हे कटकारस्थान आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करून मराठी विषय सुरू करून प्राचार्यांना निलंबित करण्याची मागणी शिक्षणमंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.