शिक्षकांच्या मार्च महिन्याच्या वेतनाचा मार्ग अखेर मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:06 AM2021-04-25T04:06:02+5:302021-04-25T04:06:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वित्त विभागाची मान्यता मिळाल्याने राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांचे मागील महिन्यापासून रखडलेले मार्च महिन्याचे वेतन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वित्त विभागाची मान्यता मिळाल्याने राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांचे मागील महिन्यापासून रखडलेले मार्च महिन्याचे वेतन लवकरच मिळणार आहे. यासंदर्भातील कारवाई पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल.
शिक्षकांच्या वेतनासंबंधी मागील महिन्यात आठहून अधिक वेळा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शालेय शिक्षण तसेच वित्त विभागाकडे पाठपुरावा केला होता. सरकारी यंत्रणेला वारंवार पत्रव्यवहार करून सरकारचे लक्ष वेधल्याची माहिती कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली. यासोबत शिक्षक भारती या संघटनेनेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती. तर भाजप शिक्षक सेलनेही वेळोवेळी वेतनासाठी उशीर केला जात असल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल, असा इशारा दिला होता.
* शिक्षक, शिक्षकेतरांचा पीएफ टॅब ओपन करण्याची मागणी
कोरोना महामारीमध्ये अनेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. अशा अडचणीच्या काळात शिक्षक, शिक्षकेतरांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम शासन त्यांना देत नसून वित्त विभागाने बंद केलेला टॅब ओपन करावा अशी मागणी शिक्षक करत आहेत. त्यामुळे पीएफ टॅब ओपन करून शिक्षकांना त्यांच्या पीएफमधून रक्कम देण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार व वित्त सचिवांकडे केली आहे.
.................................