पालघर : शिक्षण सेनेने शिक्षकांच्या मानसीक, शारीरीक व आर्थिक स्वास्थाकरीता पोषक असे ४२ ठराव महाअधिवेशनात मंजूर केले होते. या ठरावांची राज्यशासनाकडे पाठपुरावा करूनही शासनाने त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या मागण्यासंदर्भात सकारात्मक उपाययोजना करावी यासाठी बुधवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने पालघर जिल्हापरिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.शाळाना सुरूवात झाल्यानंतर शिक्षकानी सुरळीतपणे अध्यापनाचे काम सुरळीत केले असून शालांत प्रमाणपत्र परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये चांगला निकाल लागला आहे. विद्यार्थी हिताला जाणीवपुर्वक प्राधान्य देणाऱ्या शिक्षक सेनेने शिक्षकांना पोषक असे ४२ ठराव आपल्या महाअधिवेशनात मंजूर करून घेतले होते. परंतु या ठरावाच्या पाठपुरावा करूनही शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याचे शिक्षक सेनेचे म्हणणे आहे. त्यानी शिक्षणाधिकाऱ्यासह, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिलेल्या निवेदनात १) २०१५-१६ साठी शाळा निहाय शिक्षक निश्चित करताना ३० सप्टेंबर २०१५ ची विद्यार्थी संख्या विचारात घ्यावी. २) संच मान्यता विषयक कार्यवाही पारदर्शक असावी. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊनच संच मान्यता अंतीम करावी. ३) जिल्हापरिषदेच्या शिक्षण समितीवरील स्विकृत सदस्य नियुक्त करताना शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्राधान्याने विचार करावा. ४) सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक/मुख्याध्यापक सेवा निवृत्तीच्या दिवशीच सेवानिवृत्ती वेतन आदेश उपदानाचा धनादेश भ.नि.नि.चा अंतीम शिलकीचा धनादेश व अन्य लाभाचे आदेश देण्यात यावेत. ५) समायोजन नावाखाली २० जुन २०१४ च्या शासन निर्णयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत दिलेली परवानगी थांबविण्यात येऊ नये. ६) मध्यान्हीच्या भोजन कार्यक्रमातुन मुख्याध्यापक व शिक्षकांची तात्काळ मुक्तता करावी. (वार्ताहर)
शिक्षक सेनेचे धरणे आंदोलन
By admin | Published: July 01, 2015 11:20 PM