Join us

बारावी निकालासाठी शिक्षकांना हवी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:05 AM

पावसामुळे निकालाच्या कामात आल्या अडचणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने शिक्षकांना बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व गुण तक्ते ...

पावसामुळे निकालाच्या कामात आल्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य सरकारने शिक्षकांना बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व गुण तक्ते सादरीकरणासाठी सात दिवस, तर वर्गशिक्षकांना परीक्षण व नियमनासाठी नऊ दिवस दिले होते. त्याची मुदत संपली असून, अद्याप काही ठिकाणी हे काम पूर्ण झालेले नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदतही येत्या दोन दिवसांत संपत आहे; परंतु हा कालावधी अपुरा असल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठी चार दिवसांची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार केला जात असून, गेल्या तीन दिवसांतच निकालाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार १६ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाचे काम सुरू केले असून, २३ जुलैपर्यंत राज्य मंडळाकडे अंतर्गत गुण भरण्यासाठी मुदत आहे. मंडळाची संगणकीय प्रणाली त्यानंतर बंद होणार असल्याचे कळविले आहे. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे मुंबईचे काम काहीसे मागे पडले असले तरी उर्वरित दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांचे काम पूर्ण होईल, असा विश्वास मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

बारावीचे शिक्षक परिश्रमपूर्वक हे काम करीत आहेत; पण मुसळधार पावसामुळे इंटरनेट, वीज खंडित होत आहे. त्यामुळे सरकारने संगणकीयप्रणालीत विषयनिहाय गुण देण्यासाठी दिलेली मुदत वाढवावी.

- मुकुंद आंधळकर, सरचिटणीस , मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना