मुंबई - मुंबई मुख्याध्यापक संघटनेतर्फे आज दक्षिण मुंबई मधील अचानक खालसा काँलेज वरून रुईया काँलेजमध्ये शिक्षण उपसंचालक, मुंबई कार्यालयाने आयोजित केलेल्या अकरावीच्या आँनलाईन सभेत मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सभेत उभे राहण्याचीे व पाय-यांवर बसण्याची तसेच योग्य ते नियोजन न झाल्याने जो त्रास झाला, त्याबाबत संघटना तीव्र नाराजी व्यक्त करते. सदर हाँलमध्ये बसण्याची क्षमता ३००ते ३५० दरम्यान असताना दक्षिण मुंबई मध्ये एकूण ५ विभागात ५०० शाळा असताना हे ठिकाण कसे ठरविले गेले? असा प्रश्न मुख्याध्यापक संघटना व मुख्याध्यापक यांना पडला आहे.
बाहेरच्या दोन्ही गँलरीमध्ये शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी मिटिंग संपेपर्यंत उभे होते. मुळात या प्रक्रियेत मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर हे तिन्ही घटक आवश्यक असताना या प्रक्रियेतून काय साध्य झाले. ही फक्त पाटी टाकण्याकरिता सभा होती का? यामुळे अनेक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी याबाबत मुख्याध्यापकांना कळवून न येण्याचे सांगितल्याने ते सभेत आले नाहीत अन्यथा अवस्था बिकट झाली असती असे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
मुळात जर बसण्याची योग्य व्यवस्था नाही तसेच अचानक खालसा काँलेजमधून सभा बदलण्यात आली त्याची सूचनाही योग्यवेळी न गेल्याने अनेकांना चांगला वळसा बसला. कोणालाही विश्वासात न घेता शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून हे निर्णय घेतले जात असल्याने गेले काही दिवस सर्वांना त्रासच सहन करावा लागत आहे.त्यामुळे आता यावर्षी ही आँनलाईनची सुरुवात कटकटीची होणार, हेच दिसत आहे. असे म्हणणे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे असल्याचे शंकर नि.पवार, प्रशांत रेडीज, दिलशाद थोबानी,रमेश ठाकरे व हणमंत चव्हाण यांनी सांगितले. आँनलाईन नोंदणीचे ५० रुपये घ्या! शिक्षण उपसंचालक कार्यालय, मुंबई यांच्याकडून वितरीत होणा-या पुस्तिकेत काँलेजची नावे गेल्यावर्षी प्रमाणे असणार नाहीत मात्र शुल्क २५० रुपये पूर्वीप्रमाणे द्यायचे, असे प्रभारी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्या माहितीस मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा तीव्र विरोध असून जर सर्वच आँनलाईन असेल तर ही पुस्तके न छापता फक्त नोंदणीचे ५० रूपये घ्या, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेची असल्याचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले.