सहा वर्षांची प्रतीक्षा संपणार, आज शिक्षणमंत्र्यांकडून ‘शिक्षक भरती’ची घोषणा होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 10:02 AM2019-02-28T10:02:27+5:302019-02-28T10:04:50+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यासाठी शिक्षण विभागाकडून काही दिवसांपासून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

Teachers' recruitment begins today, education ministers will announce? | सहा वर्षांची प्रतीक्षा संपणार, आज शिक्षणमंत्र्यांकडून ‘शिक्षक भरती’ची घोषणा होणार ?

सहा वर्षांची प्रतीक्षा संपणार, आज शिक्षणमंत्र्यांकडून ‘शिक्षक भरती’ची घोषणा होणार ?

पुणे : राज्यातील हजारो डी.एड. व बी.एड. पात्रताधारकांचे लक्ष लागून राहिलेल्या शिक्षक भरतीच्या जाहिराती गुरूवारी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्रीविनोद तावडे मुंबईमध्ये याची घोषणा करतील. शिक्षकांच्या किती रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू होणार, या संख्येकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यासाठी शिक्षण विभागाकडून काही दिवसांपासून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी १६ टक्के आणि खुल्या गटातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण लागू झाल्याने सर्व संस्थांना बिंदुनामावली तीन वेळा अद्यायावत करून तपासून घ्यावी लागली. या अडचणींवर मात करून अखेर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहेत.
राज्यातील शिक्षक भरतीवर २०१२ पासून निर्बंध घातल्याने गेल्या ६ वर्षांपासून शिक्षकांची पदे भरली गेली नाहीत. त्यानंतर अभियोग्यता चाचणी घेऊन पवित्र पोर्टल मार्फत गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होण्यास आणखी विलंब झाला. या पार्श्वभूमीवर पात्रताधारकांकडून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. त्या पार्श्वभूमिवर शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी या भरती प्रक्रियेवर शेवटचा हात फिरविण्यात आला आहे.

दरम्यान, खासगी शाळेतील शिक्षकांना विना पगार काम करावे लागते. नोकरीसाठी संस्थाचालकाला देणगीही द्यावी लागते. शाळेला आनुदान मिळेल, पगार होईल, या आशेवर शिक्षक आपले अध्यापनाचे काम करतात. असेच काम नांदेडमधील शिक्षक चंद्रशेखर पांचाळ करीत होते. मात्र, पगार होणार नाही, त्याची काहीच शाश्वतीही नाही. या तणावाखाली असलेल्या चंद्रशेखर पांचाळ यांनी आपली राहत्या घरी गळफास घेवून आपले जीवन संपवले. या तरुण शिक्षकाच्या आत्महत्येमुळे राज्यातील खासगी शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गेल्या 6 वर्षांपासून बंद असलेल्या आजच्या शिक्षक भरतीकडे राज्यातील हजारो डीए, बीडए धारकांचे लक्ष लागले आहे. 

 

Web Title: Teachers' recruitment begins today, education ministers will announce?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.