Join us

शिक्षकांची वेतन समस्या सुटता सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे ‘एप्रिल पेड इन मे’चे पगार १० तारीख उलटली तरी झालेले नाहीत. कोविडच्या पार्श्वभूमीवर पगार ...

मुंबई : राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे ‘एप्रिल पेड इन मे’चे पगार १० तारीख उलटली तरी झालेले नाहीत. कोविडच्या पार्श्वभूमीवर पगार उशिरा होत आहेत. मात्र, याचा फटका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. अनेक ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतरांचे मृत्यू झालेले आहेत. अनेक जण तर कोविडग्रस्त असून उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. मागील महिन्यातही शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन उशिरा झाले होते. या महिन्यातही पुन्हा तोच प्रकार घडत असल्याने आता शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक शिक्षक संघटनांनी शिक्षकांचे वेतन वेळेवर होण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी लावून धरली आहे.

या अगोदरच अशा प्रकारे माध्यमिक शिक्षकांना वेतन निधीमधून डावलल्यामुळे वेतननिधी उपलब्ध न झाल्याने मागील तीन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन विलंबाने होत आहे. इतर ३७ लेखाशीर्षांखाली इतर विभागांना वेतननिधी उपलब्ध झाल्यामुळे राज्य शिक्षक परिषद संघटनेकडून ही बाब शिक्षणमंत्री व वित्तमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, अद्यापही काही शाळांचे मार्च महिन्याचे वेतनही झालेले नाही. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या वेतनाची शाश्वती शिक्षकांना आता वाटत नसल्याच्या प्रतिक्रिया ते देत आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर बेजार झालेले आहेत. त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष घालून वेतननिधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

शिक्षकांना सामोरे जावे लागत असलेल्या आर्थिक संकटाचा तोडगा शिक्षणमंत्र्यांनी काढावा, यासाठी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले असून अक्षय्यतृतीया आणि ईदच्या आधी शिक्षकांचे वेतन करावे, अशी मागणी केली आहे.