शिक्षकांनो ३१ मेपर्यंत शाळेत रुजू व्हा, प्रशासनाचे त्या शिक्षकांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 06:23 AM2023-04-27T06:23:07+5:302023-04-27T06:23:32+5:30
बदली झालेल्या शिक्षकांना आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्राथमिक शिक्षकांच्या नवीन धोरणानुसार बदली झालेल्या शिक्षकांना येत्या १५ मेनंतर जुन्या शाळा सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर नवीन शाळेवर रुजू होण्यासाठी सर्व शिक्षकांना ३१ मेची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यामुळे यंदा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार नसल्याचे स्पष्ट आहे. परिणामी बदल्यांबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.
कोरोना महासाथ, शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी आणि या बदल्यांसाठी नव्याने विकसित केलेली संगणकीय प्रणाली यामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या झाल्या नव्हत्या. बदल्यांबाबतच्या नव्या धोरणानुसार यंदा पहिल्यांदाच जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नव्या धोरणानुसार एकाच शाळेत किमान पाच वर्षे काम केलेल्या शिक्षकांना या बदली प्रक्रियेत सामावून घेण्यात आले होते. तत्कालीन ग्रामविकास मंत्र्यांनी शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण २७ फेब्रुवारी २०१७ रोजी आणले होते. या धोरणानुसार राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निर्णयाला शेकडो शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
तीव्र विरोध
बदल्यांची प्रक्रिया सुरू असल्याने अनेक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने आपापल्या मूळ जिल्ह्यातील शाळेवर जाता येते. तसेच डोंगरी, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना सुगम भागातील शाळांवर नियुक्ती घेता येते. सरकारने या बदल्याच कायमस्वरूपी रद्द केल्या तर त्याचा शिक्षकांना नाहक त्रास होणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या कायमस्वरूपी रद्द करण्यास शिक्षकांचा तीव्र विरोध असल्याचे अनेक शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.