Join us

शिक्षकांनी निवडणूक कामावर रूजू होऊ नये, कोण कारवाई करतो ते बघतो - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 3:22 PM

राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडत शिक्षकांना निवडणूक कामासाठी न जाण्याचं आवाहन केलं आहे.

MNS Raj Thackeray ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीसाठी शिक्षकांना कामावर रूजू होण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शिक्षक निवडणूक कामांमध्ये गुंतल्याने याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होणार असल्याचं सांगत आज काही पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडत शिक्षकांना निवडणूक कामासाठी न जाण्याचं आवाहन केलं आहे.

"शिक्षकांना निवडणुकीच्या कामांत गुंतवल्यानंतर त्या मुलांना कोण शिकवणार आहे, याबाबतची कोणतीही व्यवस्था नाही. निवडणूक आयोग ५ वर्ष काय करत असतं? निवडणूक आयोग स्वतंत्र यंत्रणा का तयार करत नाही? दरवेळी शिक्षकांवर दबाव का आणला जातो? निवडणूक कामावर हजर न होणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या देशात निवडणुका येणार हे आयोगाला माहीत नव्हतं का? मग तुमची यंत्रणा तयार नको का? या सगळ्यात मुलांचा काय दोष आहे? शिक्षक हे निवडणुकांचे काम करण्यासाठी आहेत की मुलांना शिकवण्यासाठी?" अशा प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरेंकडून निवडणूक आयोगावर करण्यात आली आहे.

दरम्यान, "आमच्या पक्षाचे लोक तातडीने या मुद्द्याबाबत निवडणूक आयोगाची भेट घेऊन चर्चा करतील. शिक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही निवडणूक कामावर रूजू होऊ नये, तुम्ही मुलांकडे लक्ष द्या. कोण कारवाई करतो, ते मी बघतो. निवडणूक आयोगाने नव्या लोकांना नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण द्यावं," अशी भूमिकाही राज यांनी मांडली आहे.

मराठा आरक्षणावर काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या बोलावलेल्या विशेष अधिवेशनाबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले की, "यामध्ये काहीही होणार नाही. हा विषय राज्याचा नाहीच. हा विषय केंद्र सरकारचा आणि सुप्रीम कोर्टाचा आहे. आरक्षण देण्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर झाल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही. या सगळ्यातून फक्त झुलवलं जातं. यातून काहीही हाती लागणार नाही. मी त्या दिवशी हे होणार नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यासमोरच जाऊन सांगितलं होतं," असं राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेमनसेभारतीय निवडणूक आयोगलोकसभा