ठाणे (शेणवा) : शहापूर तालुक्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांना देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार पंतप्रधानांच्या भाषणामुळे अद्यापही झालेला नाही. तो कधी होईल हे सांगता येणार नसल्याचे गटविकास अधिकारी सी.व्ही. खंदारे यांनी सांगितले.पंचायत समितीचे आदर्श शिक्षक पुरस्कार पुढे ढकलण्यामागे पंतप्रधानांचे भाषण व आगामी विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या अनिश्चिततेचे कारण गटशिक्षण प्रशासनाकडून देण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या भाषणास पाच दिवस उलटूनही आजतागायत हा पुरस्कार वितरण सोहळा घेण्याचे धाडस प्रशासन दाखवू न शकल्याने या विभागाचा गलथान कारभार समोर येत आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४६८ प्राथमिक शाळा असून ३२ केंद्रांतील १४ बिटमधील १४ आदर्श शिक्षकांना दरवर्षी आदर्श पुरस्कार देण्यात येतो. मात्र, या पुरस्काराचे वितरण करण्यात न आल्याने विद्यादान करणाऱ्या शिक्षकांची हेळसांड होत असल्याचे बोलले जाते. तालुक्यात कार्यरत १२ शिक्षक संघटनांचे पदाधिकारी याबाबत काहीही बोलताना दिसून येत नाहीत. (वार्ताहर)
पंतप्रधानांच्या भाषणामुळे शिक्षक पुरस्कार रखडले
By admin | Published: September 10, 2014 11:49 PM