मुंबई : राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये ४ ते ६ एप्रिलदरम्यान संकलित मूल्यमापन (पॅट) चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, त्याचवेळी मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा घ्यायची की निवडणूक ट्रेनिंगसाठी जायचे, असा प्रश्न शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पडला आहे. त्यात २० मेपर्यंत लांबलेल्या निवडणुकांमुळे शिक्षकांचे सुटीचे नियोजनही कोलमडणार आहे.
निवडणूक असो की सर्वेक्षण किंवा कोणतेही अशैक्षणिक काम नेहमीच शिक्षकांनाच लावले जाते. त्यामुळे दैनंदिन शालेय कामकाज कोलमडते. याचा शिक्षणमंत्र्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून विचार करावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी पत्र देऊन केली आहे.
सहलीचे पॅकेज रद्द करण्याची वेळमहाराष्ट्रात एरवी एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुका यावर्षी २० मे रोजी होणार आहेत. मुंबईमध्ये उत्तर भारत व दक्षिण भारतात मूळ गावी जाणारे हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आहेत. तसेच दीर्घ सुटी असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परदेशी अथवा देशांतर्गत प्रवासाचे नियोजन यापूर्वीच केले आहे. अचानक निवडणुकांच्या तारखा मे महिन्यात जाहीर झाल्यामुळे हे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. लाखो रुपये भरून कुटुंबासहीत बाहेर फिरायला जाण्याचे घेतलेले पॅकेज रद्द करण्याची वेळ शिक्षकांवर आलेली आहे.