मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खानलामराठी शिकवणाºया सुहास लिमये या शिक्षकांचे बुधवारी कोरोनाने सैफी रुग्णालयात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्रकार पत्नी भारती लिमये आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर ‘मला तुमची कायम आठवण येईल’, अशी पोस्ट आमिरने सोशल मीडियावर शेअर केली.
लिमये संस्कृत पंडित म्हणून ओळखले जात. अमराठी भाषकांना मराठी शिकवण्याचे कामही त्यांनी केले. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या चारही भाषांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. आमिरने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मला मराठी शिकवणारे सर सुहास लिमये यांचे निधन झाल्याचे कळताच दु:ख झाले. सर तुम्ही एक उत्तम शिक्षक होतात. आपण एकत्र घालवलेली चार वर्षे अविस्मरणीय होती. तुम्ही मला केवळ मराठी भाषा शिकवली नाही तर इतर अनेक गोष्टी शिकवल्या होतात. मला तुमची कायम आठवण येईल,’ असे म्हणत आमिरने त्यांना श्रद्धांजली वाहिली.