आयुष्याचे संस्कार गाठीशी बांधणारे शिक्षक- डॉ. शशिकला वंजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 01:18 AM2020-09-06T01:18:41+5:302020-09-06T01:18:48+5:30
शिक्षकांच्या शिस्तीमुळेच आदर्श विद्यार्थी घडतो
मला शैक्षणिक आयुष्यात भेटलेले शिक्षक हे आदर्शच होते आणि त्यांच्या शिकवणीतूनच आज मी या स्थानावर आहे. अगदी वर्गात शिक्षकांच्या आधी उपस्थित राहण्यापासून ते गृहपाठ पूर्ण हवाच या साऱ्या शिस्तीमुळे अध्यापनाची आणिस्वत: परफेक्शनपर्यंत कसे पोहोचता येईल याचा मार्ग सापडत गेला.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू
डॉ. शशिकला वंजारी यांनी शिक्षकांनी त्यांच्या आयुष्याला लावलेल्या स्वयंशिस्त आणि जबाबदारीच्या जाणिवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
एल.टी. गुलनाने सरांची आठवण डोळ्यांसमोर तरळते
खूप हुशार आणि उत्तम शिक्षक आयुष्यात मिळाले, मात्र त्यातही शिवाजी सायन्स महाविद्यालयातील एल.टी. गुलनाने सर म्हणजे आदर्शच होते. अगदी वर्गात एक दिवस नाही आले म्हणून वर्गासमोर जाब विचारल्याचा प्रसंग अजून आठवतो. मात्र त्यामुळे आपल्याकडून असणाºया अपेक्षा आणि आपली जबाबदारी याची झालेली जाणीव खूप महत्त्वाची होती. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे एखादा प्रश्न विचारायला गेल्यास त्या प्रश्नासंबंधित आधीची माहिती तुम्हाला इत्थंभूत माहीत असणे आवश्यक असायचे, त्यामुळे पुढचे पाठ मागचे सपाट कधीच झाले नाही.
शिक्षकांमुळे पुस्तकांचा प्रश्न सुटला
आज अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके सहज उपलब्ध होतात, नाहीतर हाताशी गुगल आहेच. पण त्या काळी माझ्याकडे नवीन पुस्तके घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यावेळी शिक्षकांची बुक बँक धावून आली.
प्रत्येक विषयाचे पुस्तक आणि संदर्भ पुस्तक शिक्षकांच्या मदतीने उपलब्ध व्हायचे आणि त्यामुळे अभ्यासात आणखी सहजता आली.