मुंबई: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणा-या सर्व शिक्षकांचा सर्वत्र सन्मान केला जातो. समाज कल्याण विभागात देखील प्रथमच शिक्षणाचे महत्वाचे कार्य करणा-या मुख्याध्यापक, शिक्षक, व गृहपाल यांचा शिक्षक दिनी सन्मान करण्यात येणार आहे.
राज्याच्या समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या अभिनव संकल्पनेतुन विभागीयस्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबत नुकतेच मार्गदर्शन सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सुरु असणा-या अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा, सफाई व्यावसायातील पालकांच्या मुलांसाठीच्या शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह येथे शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणा-या महापुरुषांचे जीवन व त्यांचे कार्य या विषयावर व्याख्यानांचे तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक दिनी करण्यात येणार आहे.
विभागस्तरावर त्या त्या विभागातील उत्कृष्ट काम करणारे तीन मुख्याध्यापक, तीन शिक्षक व शासकीय वसतिगृहातील तीन गृहपाल यांची निवड करुन त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरव/ सन्मान करण्यात येणार आहे. विभागस्तरावरील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते सदर शिक्षक/ मुख्याध्यापक व गृहपालांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे. सन्मान करण्यात येणा-या शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या निवडीचे निकष निश्चित करण्यात आले आहे.
निवडीचे निकष काय?
या शिक्षक निवडीसाठी प्रगत शैक्षणिक कार्यक्रम, विद्यार्थी संख्या प्रमाण, केंद्र / गट संमेलन / प्रशिक्षण मार्गदर्शन,. स्वच्छ विद्यालय पुरस्कार, विद्यार्थी आरोग्य तपासणी, शासन मान्य पुरस्कार किवा बक्षीस, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्याचा सहभाग, शिक्षकांची शैक्षणिक क्षमता व त्याच्या संवर्धनासाठी केलेले प्रयत्न, शोध निबंध लेखन, कृती संशोधन, स्वतःचे ग्रंथालय व वाचनाची आवड, सांस्कृतीक कार्यक्रमात स्वतःचा सहभाग, विद्यार्थ्यासोबत परिसर/ उद्योग क्षेत्र भेटी, डिजीटल तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, विद्यार्थ्याविषयी वाटणारी आत्मीयता व जिव्हाळा, शिष्यवृत्ती परिक्षा विद्यार्थी गुणवत्ताधारक संख्या, शिष्यवृत्ती निकाल, जादा तासिका व मार्गदर्शन शिष्यवृती तयारीने खास मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य निमीती. विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन (गायन, वक्तृत्व, कथा-कथन, लोक नृत्य, एकांकीका, विद्यार्थ्यासाठी वैशिष्ट्य पुर्ण उपक्रम, विज्ञान प्रदर्शन सहभाग व यश संपादन,निकाल ९०% पेक्षा जास्त टक्केवारी असणा-या विद्यार्थ्यांची संख्या, सामाजिक कार्यात सहभाग, तंबाखूमुक्त शाळा करणेमध्ये सहभाग, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, कोव्हिड - १९ च्या अनुषंगाने केलेले वैशिष्ट्य पुर्ण काम, शिक्षकांचे लेखनात्मक कार्य, वर्तमान पत्रातील लेखन व प्रसिध्दी, पुस्तक प्रसिध्दी, गृहपाल यांच्या निवडीचे निकषामध्ये गृहपाल वसतिगृहांत निवासी राहतात का ?, वसतिगृहाची स्वच्छता. , वसतिगृहांतील सोयी सुविधा, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, प्रवेशितांचे शाळा, महाविद्यालयास भेटी, विद्यार्थ्याशी सुसंवाद, पालक सभा आयोजन व पालक संपर्क , वसतिगृहांतील ग्रंथालय व त्यातील पुस्तकांची संख्या, वसतिगृहातील अभ्यासिका व वापर, प्रशासकीय कामकाज, ह्या मुद्याच्या आधारे उत्कृष्ट काम करणा-यांची सन्मानासाठी निवड करण्यात येणार आहे.