Join us

उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांना मिळणार विशेष पास...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 6:29 PM

निकाल वेळेवर लागण्यासाठी शिक्षकांसाठी संचारबंदी शिथिल

मुंबई : कोरोनाच्या राज्यातील प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आणि मात्र त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी व नियमासंदर्भातडचणी निर्माण झाल्या आहेत. उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्याशिवाय बोर्डाचा निकाल जाहीर होणे शक्य नाही. शिवाय निकाल लागल्याशिवाय पुढील वर्षातील प्रवेशप्रक्रियाही पार पडू शकणार नाही. त्यामुळे दहावी - बारावीचे राज्य मंडळाचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी शिक्षकांना उत्तर पत्रिकांची ने आण करता येणे शक्य व्हावे यासाठी त्यांना संचारबंदीतून सूट देणे आवश्यक होते.  या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील महानगरपालिकांच्या आयुक्तांना व सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे राज्य मंडळाशी संबंधित सर्व अधिकारी , शिक्षक , नियामक, शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष बाब म्हणून विशेष पास देऊन प्रवासासाठी परवानगी देण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दहावी आणि बारावीचा निकाल १० जून पूर्वी घोषित करणे आवश्यक आहे. यंदा बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान तर दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च दरम्यान घेण्यात आली. मात्र संचारबंदीच्या काळामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आणि वाहतूक व्यवस्था ही बंद झाली. त्यामुळे शिक्षकांना शाळेत येणे जाणे कठीण झाले. मात्र लॉकडाऊनचा वाढता कालावधी पाहता उत्तरपत्रिका तपासणी वेळेत न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील प्रवेशाना ही यामुळे लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून संचारबंदीच्या काळात विशेष बाब म्हणून शिक्षकांना पास देऊन उत्तरपत्रिका ने आण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.हा प्रवास करताना संबंधीतानी मंडळाचे लेखी आदेश व स्वतःचे ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहणार आहे. यामुळे नऊ विभागातील उत्तरपत्रिका तासांनी संबंधित अधिकाऱ्याना प्रवास करता येणे शक्य होणार आहे. तसेच यासाठी सार्वजनिक व खाजगी वाहनांचा वापर करता येणार असून त्याचा तपशील आवश्यक असल्यास मंडळालाही सादर करणे आवश्यक असणार आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी शिक्षकांचीही इच्छा आहे परंतु शिक्षण विभागानेच अद्यापही भूगोल विषय रद्द केल्यानंतर कशा पद्धतीने गुण द्यायचे याचे धोरण जाहीर केले नाही. लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांना शाळा व परीक्षकांकडे जाण्यासाठी ४ मे ला सूचना दिल्या आहेत. परंतु वाहतूक व्यवस्थाच नाही अशा वेळी कशा प्रकारे तजवीज करावी असा प्रश्न आहे. संभ्रमित शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक यांना केवळ निकाल नव्हे तर महाविद्यालयातील प्रवेशाचीही चिंता आहे. वाहतूक सुविधेची पुर्तता झाली तर निकाल वेळवर लागण्यासाठी पराकाष्ठा करावी लागेल नाहीतर दिरंगाई होऊन कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली होण्याची भीती असल्याची प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली.    

हीच बाब मुंबई मुख्याध्यापक संघटना अगोदरपासूनच बोर्डास व शिक्षण विभागाला सांगत होती.मात्र तेव्हाच लक्ष दिले असते तर आज सर्व तपासणी कार्य पुर्ण झाले असते.- प्रशांत रेडीज, सचिव , मुंबई मुख्याध्यापक संघटना

 

टॅग्स :शिक्षण क्षेत्रमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या