मुंबई : शिक्षण विभागाने शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली खरी, मात्र नंतर आता त्या निर्णयात बदल करून फेरपरीक्षेच्या तयारीसाठी शिक्षकांनी हजार राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दहावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर, तर बारावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत हाेईल. यामुळे दिवाळीची सुट्टी शाळांना सरसकट न देता जिथे दहावीची फेरपरीक्षा आहे त्या ठिकाणी शिक्षकांनी १९ तारखेला शाळेत यावे, अशा सूचना शासन निर्णयात नमूद केल्या आहेत.
दरम्यान, फेरपरीक्षा असल्याने १९ तारखेला शाळेत येऊन जमणार नाही. परीक्षा बैठक व्यवस्था आणि इतर मीटिंग पाहता किमान दाेन ते तीन दिवस आधी यावे लागेल. त्यापेक्षा ही परीक्षा दिवाळीच्या सुट्टीनंतर, ३० नोव्हेंबरचा लॉकडाऊन संपल्यानंतर घेण्याची शिक्षकांची सूचना विचारात घेतली असती तर, हा घोळ झाला नसता, असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मांडले. सतत संदिग्ध परिपत्रक काढण्यापेक्षा शिक्षण विभागाने शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांशी बोलून निर्णय घ्यावेत, अशी विनंती त्यांनी केली.