मुंबई: शिक्षकांना अध्ययनाबरोबरच अन्य कामेही करणे अपरिहार्य असते. सरकार अथवा शाळेकडून येणारी अन्य कामे निमूटपणे करत असतात. पण, तरीही शिक्षकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांचे प्रलंबित प्रश्न पाठपुरावा करुनही मार्गी लागत नाहीत. त्याचप्रमाणे शिक्षकांची वैद्यकीय बिले गेल्या कित्येक महिन्यांपासून थकित आहेत. आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी वैद्यकीय बिले ३० मार्चपर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन शिक्षकांना दिले आहे.शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाºयांच्याही प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करते. यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाने तावडे यांची भेट घेतली होती. यावेळी थकित बिलांवर तावडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. १ एप्रिलापसून शिक्षकांसाठी कॅशलेस मेडिकल पॉलिसी येत असल्याने बिलांचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेत घेण्यात आला होता. त्यावेळी शिक्षकांना हे आश्वासन मिळाले.मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची वैद्यकीय बिले त्रुटी दाखवून प्रलंबित ठेवण्याचे प्रकार शिक्षण विभागाकडून होत आहेत. त्यामुळे शिक्षकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. १ एप्रिल पासून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना लागू होणार आहे. त्यापूर्वी सर्व प्रलंबित मेडिकल बिले शिक्षकांना मिळणे आवश्यक आहे.
शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय बिले ३० मार्चपूर्वी देणार - तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:32 AM