मुंबई : शिक्षकांना हसत-खेळत गणित शिकविण्याचे धडे देण्यासाठी ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चौथी जिल्हास्तरीय गणित अध्यापक कार्यशाळा आयोजित केली आहे. विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठाण्यातील तीन हात नाका येथील टीप टॉप प्लाझामध्ये आयोजित कार्यशाळेचे मंगळवारी, २६ मार्चला सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन होईल.कार्यशाळेच्या अध्यक्षपदी खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण आहेत. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती असून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे कार्यशाळेच्या स्वागताध्यक्षपदी असतील. या कार्यशाळेतून जिल्ह्यातील गणित अध्यापकांना ज्ञानाची मेजवानी मिळण्याची अपेक्षा आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी माजी पालकमंत्री गणेश नाईक असतील.बहुसंख्य शाळकरी मुलांना गणित हा विषय क्लिष्ट जातो. गणिताची आकडेमोड व उकल करण्यात अडचणी येतात. त्याचा विद्यार्थ्यांच्या निकालावरही परिणाम होतो. ते लक्षात घेऊन मुलांना हसत-खेळत गणिताचे ज्ञान देण्याबरोबरच गणिताची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. या कार्यशाळेत राज्यातील मान्यवर गणित तज्ज्ञांची मते जिल्ह्यातील शिक्षकांना ऐकावयास मिळतील.पहिल्याच दिवशी प्राचार्य डॉ. बोथ्रा, गणितज्ज्ञ गणेश कोलते, दिलीप गोटखिंडीकर, रवींद्र येवले यांच्या व्याख्यानाने कार्यशाळेची सुरूवात होईल. तर दुसऱ्या दिवशी गणितज्ज्ञ डॉ. शुभा पाटणकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे, भगवान चक्रदेव, भगवान पांडेकर, जयंत घाडगे आदींचे व्याख्यान होणार आहे. तसेच गणित अध्यापकांशी संबंधित विविध विषयांवरही चर्चा केली जाईल, अशी माहिती स्वागताध्यक्ष आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी दिली. या कार्यशाळेला सुमारे ७०० शिक्षकांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे आयोजकांनी सांगितले. एकूण दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या बुधवारी होणाºया समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंदरे विकास व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण असतील.
हसत-खेळत गणितासाठी ठाण्यात उद्या अध्यापक कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 9:43 PM