गरजूंना मदत करण्याची शिकवण आई-बाबांकडून; मसाला किंग धनंजय दातार यांच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 08:44 AM2020-11-13T08:44:31+5:302020-11-13T08:47:07+5:30
गेल्या ७ ऑगस्ट रोजी एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाला केरळमधील कोझिकोड विमानतळावर उतरताना अपघात झाला.
मुंबई : ‘आपल्याकडून शक्य होईल तेवढे समाजाला देऊन गरजूंना मदत करावी, अशी शिकवण माझ्या आई-बाबांनी मला दिली व त्याच मार्गांनी मी चालत आहे,’ असे दुबईतील अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांनी म्हटले.
गेल्या ७ ऑगस्ट रोजी एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाला केरळमधील कोझिकोड विमानतळावर उतरताना अपघात झाला. त्यात केरळमधील चेरिक्का परंबिल राजीवन (६१) यांचा मृत्यू झाला. ते दुबईत स्प्रे पेटिंगचे काम करायचे. राजीवन त्यांची मुलगी अनुश्री हिच्या विवाहाच्या तयारीसाठी गावाकडे येत होते. राजीवन यांचा मृत्यू कुटुंबाला हा मोठा धक्का होता.
या पार्श्वभूमीवर अनुश्री हिच्या लग्नासाठी डॉ. धनंजय दातार यांनी एक लाख रूपये विशेष भेट दिले. दातार यांनी या विमान अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना व्यक्तीगत निधीतून २० लाख रूपये मदत जाहीर केली व ती त्यांच्या खात्यांत जमाही झाली. या कुटुंबीयांनी व्हॉटस ॲप ग्रुप स्थापन केला व दातार यांना झूम मिटींगमध्ये त्यांचे आभार मानण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्यांनी वरील भावना व्यक्त केल्या. अपघातामुळे अनुश्रीचा विवाह लांबणीवर पडल्याचे समजताच दातार यांनी या बैठकीत आणखी एक लाख रूपये विवाहभेट जाहीर करून हस्तांतरित केले. नुकताच हा विवाह पार पडला व राजीवन कुटुंबाने दातार यांच्या सहृदयतेबद्दल आभार मानले.