Join us

अनुयायींच्या व्यवस्थापनासाठी राबली २७०० सैनिकांची टीम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 12:16 AM

महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायींचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या जोडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे तब्बल २७०० सैनिक कार्यरत होते.

- खलील गिरकर मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायींचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या जोडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे तब्बल २७०० सैनिक कार्यरत होते. यामध्ये २२०० पुरुष सैनिकांसोबत ५०० महिला सैनिकांचादेखील समावेश होता. याशिवाय, सुमारे ५ हजार स्वयंसेवक या कामासाठी तैनात होते.बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ ला स्थापन केलेल्या समता सैनिक दलात सध्या देशभरात १४ हजार प्रशिक्षित सैनिक कार्यरत आहेत. भारतीय बौद्ध महासभेतर्फे त्यांचे संचलन करण्यात येते. ज्युदो कराटे, लाठी काठी, कायद्याचे प्रशिक्षण अशा विविध प्रशिक्षणांद्वारे त्यांना सैनिकी शिक्षण देण्यात येते. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी लाखोंच्या संख्येत देशभरातून जमणाºया अनुयायांचे व्यवस्थापन करण्यासाठी समता सैनिक दलाचे सैनिक दरवर्षी कार्यरत असतात. यंदा महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच गुजरातमधील सुरत, कर्नाटकमधील बेळगावी, गुलबर्गा, राजस्थान, मध्य प्रदेशमधील सागर व इतर ठिकाणांहून सैनिक मुंबईत दाखल झाले होते, अशी माहिती दलाचे कार्यालय सचिव मेजर जनरल डी.एम. आचार्य यांनी दिली.सकाळी व रात्री अशा दोन टप्प्यांत १२ विभागांमध्ये व्यवस्थापन केले गेले. सकाळच्या सत्रात ७०० सैनिक कार्यरत होते, त्यामध्ये २०० महिला सैनिकांचा समावेश होता. मात्र, रात्रीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महिलांवर सोपवण्यात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दादर, चैत्यभूमी, शिवाजी पार्क या महत्त्वाच्या ठिकाणांसह एकूण १२ विभाग बनवण्यात आले व त्यामध्ये प्रत्येक विभागाची जबाबदारी दोन अधिकारी व त्यांच्या सोबत गरजेनुसार ५० ते ६० सैनिकांवर सोपवण्यात आली.।दलाकडे वळत आहे तरुणबौद्ध समाजातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने समता सैनिक दलाकडे वळत असल्याचा दावा आचार्य यांनी केला. वंश, धर्म, जात, लिंग भेद विरहित समाज तयार करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी समता सैनिक दलाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती आचार्य यांनी दिली. समता सैनिक दलाचे सैनिक पूर्ण गणवेशात कार्यरत होते. त्यांच्याशिवाय साध्या वेशातील सुमारे ५ हजार स्वयंसेवकही कार्यरत होते. त्यामध्ये सुमारे २ हजार महिला स्वयंसेवकांचा समावेश असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर