यदु जोशी / मुंबईराज्य सरकारचे धोरणात्मक निर्णयाचे स्वरुप निश्चित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री व भाजप पदाधिकाऱ्यांची एक टीम तयार केली आहे. या ‘टीम सीएम’च्या नियमित बैठका पुढील काळात होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार,शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. डॉ. संजय कुटे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे. याशिवाय त्या-त्या विषयाच्या अनुषंगाने दोन किंवा तीन जणांचा दरवेळी टीममध्ये समावेश केला जाईल. समितीची बैठक अलिकडेच झाली, पण त्या संबंधी कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. सूत्रांनी स्पष्ट केले की भाजपाची कोअर कमिटी आधीपासूनच आहे आणि ती पक्षसंघटन, सरकारबाबतची भूमिकाही ठरवत असते. ती कायम राहीलच. मुख्यमंत्र्यांनी तयार केलेली नवीन टीम कोअर कमिटीला छेद देण्यासाठी नाही. ती सरकारच्या महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांची पार्श्वभूमी निश्चित करेल. मुख्यमंत्र्यांच्या व्हिजनच्या अनुरुप विकासाचे तसेच लोकाभिमुख असे कोणते निर्णय घेणे आवश्यक आहे याची चर्चा समिती करेल. सरकारसाठी अडचणीच्या ठरणाऱ्या विषयावर कोणती भूमिका घेतली पाहिजे (क्रायसिस मॅनेजमेंट) यावरही काम करेल. याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यातील पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांना द्यावयाच्या पॅकेजसंदर्भात चर्चा झाली.
धोरणात्मक निर्णयांसाठी ‘टीम सीएम’
By admin | Published: April 26, 2017 2:33 AM