शाबास मुंबई पोलिस ! लाखोंच्या गर्दीचं उत्तम नियोजन, कुठेही गालबोट लागले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 09:58 AM2024-07-05T09:58:48+5:302024-07-05T09:59:07+5:30
सायंकाळी साडेचार ते पावणेपाच दरम्यानच वानखेडे स्टेडियम फुल झाल्याने त्याचा गेट बंद करण्यात आला. मात्र, गेट बाहेर असलेल्या चाहत्यांनी आतमध्ये जाण्यासाठी हट्ट धरला.
मनीषा म्हात्रे
मुंबई - विश्वविजेत्यांच्या विजयोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणांहून चाहत्यांनी लाखोंच्या संख्येने मुंबई गाठली. अनपेक्षित गर्दीमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र, मुंबई पोलिसांच्या काटेकोर नियोजनामुळे विजयोत्सवाला कुठेही गालबोट लागले नाही.
परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी आदल्या दिवशीच नागरिकांना रेल्वेने येण्याचे आवाहन केले होते.
जवळपास लाखोंच्या संख्येने चाहत्यांनी मरिन ड्राइव्ह परिसरात गर्दी केली होती. साध्या गणवेशातील पोलिस चाहत्यांच्या गर्दीत सहभागी झाले होते. पाच हजारांहून अधिकचा फौजफाटा सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होता. सायंकाळी साडेचार ते पावणेपाच दरम्यानच वानखेडे स्टेडियम फुल झाल्याने त्याचा गेट बंद करण्यात आला. मात्र, गेट बाहेर असलेल्या चाहत्यांनी आतमध्ये जाण्यासाठी हट्ट धरला. अखेर, गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली.
माझ्या सहकारी मित्रांनो, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत झालेल्या विजयी यात्रेमध्ये तुम्ही केलेले व्यवस्थापन आणि कर्तव्यप्रती असलेले समर्पण वाखण्याजोगे आहे. सर्व अधिकाऱ्यांचा मला अतिशय अभिमान वाटतो.
— पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) July 4, 2024
आणि मुंबईकरांनो, मनापासून धन्यवाद तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.… pic.twitter.com/Ix47jPdJ0V
यांची महत्त्वाची कामगिरी
मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी, वाहतूक विभागाचे पोलिस सहआयुक्त अनिल कुंभारे, अपर पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत सर्व परिस्थिती सुरळीत हाताळली.
रेल्वे पोलिसांची मोलाची साथ
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रेल्वेने ये-जा करणार असल्याने रेल्वे पोलिसांनीही सीएसएमटीसह मरीन लाइन, चर्चगेटसह महत्त्वाच्या स्थानकात कडेकोट बंदोबस्त तैनात केला. जवळपास ५०० जणांचे पथक बंदोबस्तासाठी तैनात होते. रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सर्व घडामोडींचा आढावा घेतला.
पर्यायी मार्गांवर वाहनांच्या रांगा
एन. एस. मार्गाची उत्तर व दक्षिण वाहिनी सायंकाळी ४ नंतर एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. वीर नरिमन रोड चर्चगेटपासून किलाचंद चौक, दिनशॉ वाच्छा मार्ग डब्ल्यूआयए चौकापासून रतनलाल बुबना चौकापर्यंत तसेच हुतात्मा चौकापासून वेणूताई चव्हाण चौकापर्यंत मादाम कामा रोड बंद ठेवण्यात आला होता.