'आबाचं ध्यान आलं म्हंजी आपोआप डोळ्यात पाणी येतंय', आजीचा भावूक व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 05:04 PM2021-12-16T17:04:28+5:302021-12-16T17:05:49+5:30
रोहित पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एका आजीबाईच्या डोळ्यात अश्रू दिसून येत आहेत. आबाचा ध्यान आलं म्हंजी आपोआप डोळ्यात पाणी येतंय, असे म्हणत त्या आजीच्या डोळ्यात खरोखरंच पाणी आल्याचं दिसत आहे.
मुंबई - मरावे परि किर्तीरुपी उरावे या म्हणीचा साक्षात्कार पुन्हा एकदा आला आहे. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांची गावाशी आणि गावातील लोकांशी जिव्हाळ्याची कनेक्टीव्हीटी होती. गावगाड्यापासून ते मंत्रालयापर्यंत आर.आर. यांच्या साधेपणाची आणि कामाच चर्चा असत. आबांच्या याच साधेपणाच्या आठवणी हजारो व्यक्तींच्या मनी ठायी वसल्या आहेत. त्यामुळेच, आजही आबांचे नाव निघताच अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. रोहित पाटील यांनी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
रोहित पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एका आजीबाईच्या डोळ्यात अश्रू दिसून येत आहेत. आबाचा ध्यान आलं म्हंजी आपोआप डोळ्यात पाणी येतंय, असे म्हणत त्या आजीच्या डोळ्यात खरोखरंच पाणी आल्याचं दिसत आहे. आजीबाईने पदराने आपले डोळे पुसले. केवळ 20 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावतो. आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनीही ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत, हा व्हिडिओ मी पाहिला आणि परत परत ऐकत पाहात राहिलो, असे रोहित यांनी सांगितले.
तसा 'आमचा' आबा हुताच!
— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) December 15, 2021
या आज्जींचा हा एवढाच छोटा व्हिडिओ मी पाहिला आणि परत परत ऐकत पाहत राहीलो.#rrpatil#wewillrisepic.twitter.com/eMxN9DP7bp
महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यकुशल आणि संवेदनशील मनाचा नेता म्हणून आर.आर. पाटील यांची ओळख होती. राज्याचे गृहमंत्री असतानाही साधेपणा आणि नम्रता हे दोन गुण त्यांनी कधीही सोडले नाहीत. त्यांच्या याच साधेपणामुळे गावाकडच्या आजीबाईलाही तो गृहमंत्री आपल्या लेकासारखा वाटायचा. म्हणूनच, आबांना जाऊन 6 वर्षे झाल्यानंतरही त्यांच्या आठवणीने या आजीबाईचे डोळे पाणावले आहेत. दरम्यान, 16 फेब्रुवारी 2015 रोजी आर. आर. पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.