Join us

सुबोध भावे दिग्दर्शित 'पुष्पक विमान' सिनेमाचा टिझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 1:44 PM

'कट्यार काळजात घुसली' या दमदार सिनेमानंतर अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे पुन्हा एकदा 'पुष्पक विमान' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई - 'कट्यार काळजात घुसली' या दमदार सिनेमानंतर अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे पुन्हा एकदा 'पुष्पक विमान' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुपरडुपर हिट 'कट्यार काळजात घुसली' सिनेमा इंडस्ट्रीला दिल्यानंतर सुबोध भावेचा आगामी सिनेमा 'पुष्पक विमान' बाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या बहुचर्चित सिनेमाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. 41 सेकंदांचा हा टिझर आजोबा-नातू नातेसंबंधांवर आधारित आहे. यामध्ये मोहन जोशी आणि सुबोध भावे आजोबा-नातूची भूमिका साकारणार आहेत. 3 ऑगस्टला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

सुबोध भावे हा एक प्रतिभाशाली कलावंत असल्याचे त्याने 'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली' यांसारख्या सिनेमांद्वारे सिद्ध केले आहे. तो केवळ चांगला कलाकारच नाही तर दिग्दर्शकदेखील आहे. 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाच्या माध्यमातून त्यानं आपले दिग्दर्शन कौशल्या दाखवले. 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या सिनेमासाठी सुबोधने केलेल्या दिग्दर्शनाचे चांगलेच कौतुक झाले होते. 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमानंतर सुबोध आता कोणत्या सिनेमाचं दिग्दर्शित करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. 

यापार्श्वभूमीवर आता सुबोध आपला दुसरा सिनेमा 'पुष्पक विमान' प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सुबोध भावेसोबत या सिनेमाचे दिग्दर्शन वैभव चिंचाळकरदेखील करणार आहे. दरम्यान, सुरुवातीपासून सुबोधनं सिनेमा, कलाकार, मुख्य भूमिका याबाबत कमालीची गुप्तता पाळल्याचे दिसत आहे. टिझर पाहताना याचा अनुभव येतो. आवाजावरुन जरी मोहन जोशी यांना आपण ओळखलं असलं तरीही टिझरमध्ये दोन्ही कलाकारांचे चेहरे दाखवण्यात आलेले नाहीत. यामुळे सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

टॅग्स :सुबोध भावे करमणूक