लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळवण्यापासून ठाकरे आणि शिंदे गटात सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कात, तर शिंदेंचा आझाद मैदानात पार पडणार असला तरी दोन्ही गटांकडून टीझरवरून एकमेकांवर शरसंधान केले जात आहे. ठाकरे गटाकडून ‘मर्दांचे एकच ठिकाण शिवतीर्थ दादर’ अशा मथळ्याचा टीझर काढण्यात आला आहे. त्यावर शिंदे गटाकडून ‘आझाद शिवसैनिकांचा आझाद मेळावा’ असे टीझर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दरवर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित होतो. तिथे नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी द्यायची यावरून वाद होत होता; पण यंदा शिंदे गटाकडून सामोपचाराची भूमिका घेतली गेली व आझाद मैदान येथे मेळावा आयोजित करण्यात आला. आता ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीझर लाँच झाला आहे. त्यात शिंदे गटावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे. काही जण पळून जाणारे असतात. रात्रीच्या अंधारात स्वार्थासाठी इमान विकणारे असतात, खोक्यांपायी विकले जाणारे असतात; पण मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाहीत. मर्दाचे एकच ठिकाण शिवतीर्थ दादर, दसरा मेळावा मर्दांचा मेळावा, असे या टीझरमध्ये म्हटले आहे.
‘वारसा खऱ्या विचारांचा हवा’
यावर शिंदे गटाकडून वारसा हा खऱ्या विचारांचा असायला हवा, सडक्या मनोवृत्तीचा नको. ओरिजनल विचार शिवसेनाप्रमुखांचे आमच्याकडे आहेत. आझाद शिवसैनिकांचा आझाद मेळावा हा आझाद मैदानावर असणार आहे, असे प्रत्युत्तर दिले गेले आहे.