मुंबई - मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. दररोज लाखो पावले स्वप्नपूर्तीसाठी मुंबईत येतात. काहींची स्वप्ने पूर्ण होतात तर काहींच्या नशिबी मात्र यातना ठरलेल्या असतात. या मायानगरीत आजही लाखो लोक उपाशीपोटीच झोपतात. कुणीतरी घास देईल का? हाच भाव त्यांच्या डोळ्यात दाटलेला असतो. अशा भुकेल्यांसाठी नवी हेल्पलाईन आकारास आली आहे. मुंबईकर नागरिकांची चळवळ असलेल्या “खाना चाहिये फाउंडेशन”ने त्यात विशेष पुढाकार घेतला आहे. भुकेल्यांना दोन घास देण्यासाठी एक व्हॉट्सअॅप चॅटबोट तयार करण्यात आला आहे. तो एखाद्या हेल्पलाईनसारखे काम करतो.
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या कोणत्याही नागरिकाने ७६६९८ ००४७० या क्रमांकावर पिंग केले की त्याला आपल्या परिसरातील भुकेल्या नागरिकांची माहिती खाना चाहिये फाऊंडेशनला देता येणार आहे. त्यानंतर "खाना चाहिये"चे तरुण स्वयंसेवक आपल्या संपर्कातील नजीकच्या व्यक्तीशी संपर्क साधून तातडीने धाव घेऊन भुकेल्या व्यक्तीला जेवण पोहोच करणार आहेत. हा चॅटबोट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅप आणि गपशप यांच्या भागीदारीतून तो विकसित करण्यात आला आहे. प्रथम इंडिया, गिव्ह इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नामांकित बँकर उज्वल ठकार यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला.
"भुकेल्यांना मदत करण्यासाठी आणि त्या कामात सामान्य माणसांचा सहभाग वाढविण्यासाठी पूर्वी सहजसोपा असा पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र या नव्या उपक्रमामुळे व्हॉट्सअॅप वापरणारा मोठा वर्ग या मोहिमेशी जोडला जाईल" असा विश्वास "खाना चाहिये"चे सहसंस्थापक आणि डिजिटल हेड स्वराज शेट्टी यांनी सांगितलं. आम्ही सुरुवात केली आहे, आता या कामात सातत्य ठेवणे, आणि भुकेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. गपशपचे सीओओ रवी सुंदरराजन म्हणाले, “या उपक्रमाच्या माध्यमातून समृद्ध करणारा अनुभव घेण्याची संधी मिळाली. यामुळे अधिकाधिक गरजू लोकांना दररोज भोजन देता येईल”.
“खाना चाहिये” फाउंडेशनची स्थापना ऐन कोरोनाच्या काळात म्हणजे २९ मार्च २०२० रोजी झाली. उत्पन्नाचा स्रोत गमावलेल्या गरजूना जेवण देणे अन्न देणे हाच या संस्थेचा उद्देश होता. पहिल्या लॉकडाउनच्या काळात “खाना चाहिये” ने ४० लाखहुन अधिक गरजूंना अन्न आणि अन्नधान्याचे २० हजार किट्सचे वाटप केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही १७ लाख अन्नाची पाकिटे आणि अन्नधान्याची ४१ हजार किट्स वाटण्यात आली. “खाना चाहिये” हा उपक्रम जनतेच्या आर्थिक साहाय्यातून चालतो आणि मुंबईतील त्यांची तीन कम्युनिटी किचन्स महिला बचत गटांच्या माध्यमातून चालविण्यात येतात. मजूर, रिक्षाचालक, लोककलाकार, भटक्या जमाती वर्गातील लोक “खाना चाहिये”च्या योजनांचे लाभार्थी आहेत. वेश्याव्यवसायातील महिला तसेच तृतीयपंथी यांच्यासाठीही संस्था काम करते.