सारा तेंडुलकरच्या बनावट अकाऊंटवरून शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्विट, सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 11:35 AM2018-02-08T11:35:34+5:302018-02-08T11:53:10+5:30
सारा तेंडुलकर हिच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंड उघडणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंड उघडणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट सुरू करून त्या अकाउंटवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एका तरुणाला अंधेरी येथून अटक केली आहे.
नितीन आत्माराम सिसोदे असे या तरुणाचे नाव आहे. सायबर पोलिसांनी त्याला अंधेरीतून अटक केली आहे. पाच महिन्यांपूर्वी नितीनने गुगलवरून साराचा फोटो डाउनलोड केला. त्यानंतर तिच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट उघडलं. गेल्या वर्षी ९ ऑक्टोबरला याच बोगस अकाउंटवरून शरद पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट करण्यात आलं होतं. त्याच दरम्यान सारा लंडमध्ये शिकत असल्याने सचिनच्या स्वीय सहाय्यकांनी सायबर पोलिसांत तक्रार केली होती.
या प्रकरणी सायबर पोलिसांनी चौकशी केली. ज्या मोबाइल फोनवरून बोगस ट्विटर अकाउंट उघडलं होतं, त्याच्या आयएमइआय क्रमांकावरून मंगळवारी पोलिसांनी मोबाइल क्रमांक आणि आयपी अॅड्रेस ट्रेस केला. त्याआधारे पोलीस नितीनच्या घरी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नितीनला न्यायालयात हजर केले असता, ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, याआधी सारा तेंडुलकरचं अपहरण करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. देवकुमार मैती असं त्याचं नाव असून तो साराला धमकी देत होता. लग्नासाठी नकार दिला तर तुझं अपहरण करीन, अशी धमकी त्याने साराला दिली होती. सचिन तेंडुलकरने याबद्दल तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती. सचिनच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत देवकुमारला अटक केली.