हार्बरवर बारा डब्यांची लोकल चालविण्यास तांत्रिक अडथळा
By admin | Published: April 21, 2016 03:00 AM2016-04-21T03:00:30+5:302016-04-21T03:00:30+5:30
हार्बर मार्गावर लवकरात लवकर बारा डब्यांची लोकल चालविण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मंगळवारी मध्यरात्री बारा डब्यांच्या लोकलची चाचणी घेण्यात आली.
मुंबई : हार्बर मार्गावर लवकरात लवकर बारा डब्यांची लोकल चालविण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मंगळवारी मध्यरात्री बारा डब्यांच्या लोकलची चाचणी घेण्यात आली. या घेण्यात आलेल्या चाचणीत दोन स्थानकांजवळ अपुऱ्या पायाभूत सुविधांचा अडथळा निर्माण होतानाच तांत्रिक समस्याही उद्भवली आहे. मात्र हे अडथळे दूर होतील, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मंगळवारी मध्यरात्री सीएसटी ते पनवेल मार्गावर चाचणी घेण्यात आली. परंतु या चाचणीत डॉकयार्ड आणि वडाळा या दोन स्थानकांत तांत्रिक अडचणी उद्भवल्याचे समोर आले. डॉकयार्ड रोड स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी बारा डब्यांच्यादृष्टिने कमी पडत आहे. हे पाहता त्याचे काम करण्याची सूचना मुंबई रेल्वे विकास महामंडळास करण्यात आल्याचे मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. वडाळा येथील प्लॅटफॉर्मजवळ सिग्नलच्या खांबांची जागा नेमकी मोटरमन केबिनच्या जवळ येत असल्याने मोटरमनला सिग्नल पाहण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नियमानुसार सिग्नल खांबांच्या जागेसाठी काही अंतर राखणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या दोन्ही तांत्रिक अडचणी लक्षात घेता बारा डबा लोकल सुरु करण्याची मुदत सांभाळणे मध्य रेल्वेला कठीण झाले आहे. हार्बरवरील माहीम स्थानकातील प्लॅटफॉर्मचेही काम केले जाणार आहे. हे काम २0 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून हाती घेण्यात आले असून त्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत आहे. यासाठी सीएसटीहून वान्द्रे आणि अंधेरीहून सीएसटीसाठी सुटणारी शेवटची लोकल रद्द असेल. (प्रतिनिधी)