Join us

ॲपमध्ये तांत्रिक अडचण, अन् माहितीचा अभाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 1:42 AM

भर उन्हात ज्येष्ठ नागरिकांचे हाल; दुपारनंतर लसीकरणाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर म्हणून पोलीस विभागासह आणि इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्याचा कार्यक्रम नियमित सुरू आहे. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. मुंबईतदेखील सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार होती. मात्र, कोविन ॲपच्या नवीन अपडेटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने लसीकरण खोळबंले होते; त्यानंतर दुपारनंतर बऱ्याच केंद्रावर लसीकरण प्रक्रियेस आरंभ झाला. 

मुंबई सेंट्रल येथील एसआरसीसी रुग्णालयात सोमवारी दुपारी २ वाजल्यानंतरही लसीकरण प्रक्रिया सुरू झाली नव्हती, रुग्णालयात आपत्कालीन कक्षाच्या बाहेर सावलीत ज्येष्ठ नागरिकांची बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, सकाळपासून लस घेण्यासाठी उत्सुकतेने आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडलेले दिसून आले. नोंदणीतील तांत्रिक अडचण, माहितीचा अभाव, लसीविषयीचे गैरसमज अशा अनेक मुद्यांमुळे या ज्येष्ठ नागरिकांच्या मनात गोंधळ असलेला दिसून आला. रुग्णालय व्यवस्थापनाने कोविन ॲपखेरीज रुग्णालयाचा अर्जही भरून देण्यास सांगितल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये काहीसा रोष दिसून आला. याविषयी, लसीकरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांना विचारले असता सकाळपासून कोविन सिस्टीम डाउनलोड हाेत नसल्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचे सांगितले. याशिवाय कोविन ॲपवर नोंदणी न करता ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केल्याने याठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झाला. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा असूनही प्रक्रिया सुरू करताना यातील तांत्रिक अडचणी दूर करणे महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास पुन्हा लसीकरण केंद्रावर गर्दी आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे, असे मत लसीकरणासाठी आलेल्यांनी मांडले.

घाटकोपर येथील एच. जे. दोशी हिंदू महासभा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरही सकाळी ९ वाजेपासून लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र, कोविन सर्व्हर डाऊन असल्यामुळे लसीकरण प्रक्रिया सुरू होण्यास दुपार झाली. त्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया अत्यंत कासव गतीने सुरू होती; परिणामी बरेच लाभार्थी लस न घेताच माघारी परतले. याविषयी रुग्णालयातील लसीकरण नोडल अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, लसीकरणाला स्थानिक पातळीवर कोणताही अडसर नसून संकेतस्थळावर तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने इथे गोंधळ सुरू झाला आहे, त्यामुळे लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया सहज आणि सोपी करणे अत्यंत गरजेचे आहे,जेणेकरून लाभार्थी गट हा ज्येष्ठ नागरिकांचा असल्याने लसीकरणाची प्रक्रिया लांबलचक न ठेवता अडथळाविरहित राहिल्यास हा टप्पा सुलभतेने पार पडेल.

सुरक्षिततेची भावना सकाळी ११ वाजल्यापासून रुग्णालयात वाट पाहत आहे. मात्र, कोविनच्या  संकेतस्थळावर नोंदणी करूनही लस मिळण्यासाठी कित्येक तास उलटले. या रुग्णालयात कोविशिल्ड लस मिळाली आहे, कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळानंतर लस मिळाल्याने सुरक्षिततेची भावना आहे. - राजनाथ दालमिया, एसआरसीसी रुग्णालय

पदरी निराशाच कोविन संकेतस्थळावर सकाळी नोंदणी करून हे लसीकरण केंद्र गाठले, त्यानंतर तीन तास वाट पाहावी लागली. इतकी वाट पाहूनही ओटीपी जनरेट न झाल्यामुळे लस मिळाली नाही. त्यामुळे या प्रक्रियेविषयी खेद वाटतोय. लसीकरण असे स्वरूप ठरविताना ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार होणे गरजेचे होते. सकाळपासून भर उन्हात सर्व मंडळी ताटकळत उभी हाेती. कित्येक तास थांबूनही बऱ्याच लोकांना लस मिळाली नाही. त्यामुळे या प्रक्रियेचा पुनर्विचार करून त्यात अधिक सुलभता आणावी. - कोमल सक्सेना, एसआरसीसी रुग्णालय 

नियमांचे पालनकरणे गरजेचे सकाळी ११ वाजता रुग्णालयात आले, मात्र या ठिकाणी आधीपासूनच लस घेण्यासाठी गर्दी झाली होती. लस घेण्याची प्रक्रिया, नोंदणी आणि अन्य माहितीविषयी नागरिकांमध्ये अभाव असल्यामुळे कोरोनाविषयक कोणतेही नियम काेणीही पाळताना दिसून आले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही धोक्याची घंटा आहे. सर्वप्रथम पालिकेने व अन्य रुग्णालयांनी मास्कचा वापर स्वच्छता आणि नंतर आपण याविषयी गांभीर्य बाळगले पाहिजे. - प्रेमलता सरेकर,एच. जे. दोशी हिंदू महासभा रुग्णालय

टॅग्स :कोरोनाची लस