मुंबई : मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा ठप्प झाली असून परळ ते माटुंगा दरम्यान पाच ते सहा लोकल एका मागोमाग एक थांबल्या आहेत.
लोकलसेवा ठप्प झाल्याचे अद्याप कारण समजलेले नसले तरीही सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने लोकल खोळंबल्या आहेत.
काही वेळापूर्वीच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात शुक्रवारी (26 एप्रिल) लोकलला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हार्बर लाईनवरील एक लोकल ट्रेन बफरला धडकली आहे. फलाट क्रमांक एकवर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. लोकल ट्रेन बफरला धडकल्याने जोराचा आवाज झाला. दरम्यान, या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. मात्र फलाट क्रमांक एकवरील वाहतून काही काळ खोळंबली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकलचा वेग कमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, मोटरमनने तातडीने ब्रेक दाबल्याने बसलेल्या झटक्यामुळे लोकलच्या डब्यांना हादरा बसला. मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ही या घटनेनंतर काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र लोकल तातडीने मागे घेत मार्ग मोकळा करण्यात आला. त्या नंतर काही काळ बंद पडलेली हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.