- संकलन : कुलदीप घायवटमुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील लोकल दररोज उशिराने धावतात. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब होतो. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी लोकल बिघाड झाल्यामुळे लाखो प्रवाशांना या बिघाडाचा सामना करावा लागतो. रविवारी मेगाब्लॉक, ब्लॉक घेण्यात येतात. मात्र, तरीही लोकल खोळंबा होतो. दुसरीकडे सरकार बुलेट ट्रेन, मेट्रो आणत आहेत. मात्र, रेल्वेची सुधारणा करत नाही. त्यामुळे लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाचा या ढिसाळ कारभाराविरोधात नाराजीचा सूर आहे. तांत्रिक वा तत्सम बिघाडामुळे नियोजनाची रुळावरून घसरलेली ही गाडी रुळावर यावी, यासाठी रखडलेले प्रकल्प, लोकलच्या फे-या, आधुनिक यंत्रणा, सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती आदी अनेक उपाययोजनांची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.वेळापत्रकानुसारच लोकल सुटाव्यातदर आठवड्याला रेल्वे रूळ दुरुस्ती, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती यासाठी मेगाब्लॉक घेऊनही अनेकदा याच तांत्रिक अडचणी निर्माण होऊन लोकलसेवा वारंवार विस्कळीत होते. त्यातच पावसात लोकल मार्गातील नाले तुंबतात आणि अनेकदा लोकल सेवेला ब्रेक लागतो. त्यामुळे यातील काहीलोकल रद्द केल्या जातात. काही वेळेस वेळापत्रकानुसार लोकल सुटतच नाहीत. ‘लोकल देरी से आने की संभावना है’ एवढेच सांगून वेळ मारून नेली जाते. ती किती मिनिटे उशिराने येणार, हे सांगितले जात नाही.त्यामुळे जलद मार्गाच्या फलाटावरील उभे असलेले प्रवासी जलद गाडीने लवकर पोहोचू या अपेक्षेने समोरील धिम्या मार्गावरून जाणाºया तीन-चार लोकल तरी सोडतो. डोंबिवली स्थानकात हा नेहमीच अनुभव येतो. त्यामुळे उशिरा आलेल्या लोकलमुळे कितीही गर्दी असली, तरी जिवावर उदार होऊन लटकत प्रवास करावा लागतो. यात अनेकदा प्रवाशांचा जीव जातो. वेळापत्रकानुसारच लोकल सुटाव्यात, ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. यात कुचराई करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.- मुरलीधर धंबा, डोंबिवली.मुंबईची ‘लाइफलाइन’ नव्हे ही तर ‘डेथलाइन’मुंबईची लाइफलाइन ही व्याख्या बदलून डेथलाइन बनू पाहत आहे. त्यामुळे मुंबई लोकल प्रवास हा जगातील सर्वाधिक धोकादायक प्रवास झाला आहे. दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने प्राथमिक सुविधा पुरविण्यावर भर द्यायला हवा. पादचारी पुलांची झालेली पडझड, दिवसेंदिवस वाढणाºया गर्दीचा रेल्वेवर पडणारा ताण, त्यामुळे होणारे अपघात, तांत्रिक बिघाडांमुळे रेल्वेचे कोलमडणारे वेळापत्रक, स्टंटबाजांचा सुळसुळाट, उडाणटप्पूंची छेडछाड, त्यांच्यावर कडक कारवाई न करणारे पोलीस, रेल्वे स्टेशनवरील गलिच्छ प्रसाधनगृहे तसेच चाकरमान्यांच्या खिशाला तिकीट वाढीमुळे पडणारे भगदाड अशा सर्व समस्यांना सामोरे जात प्रवासी प्रवास करतो. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर, समाधानकारक व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटनांसोबत चर्चा करून प्रवाशांकडून प्रतिक्रिया मागवून त्यावर विचारविनिमय करत योजना बनवाव्यात.- मनस्वी रायपुरे, कल्याण.प्रशासन जबाबदारी झटकतेमध्य रेल्वे म्हणजे रोजची गर्दी आणि लोकलला उशीर हे जणू समीकरणच बनले आहे. मेगाब्लॉक घेऊन तांत्रिक अडचणी सुधारता येत नाहीत, लोकलवरील ताण कमी करता येत नाही आणि दरवाज्यात उभे राहून इतर प्रवाशांना चढायला देत नाहीत. ही मुख्य कारणे लक्षात घेऊन लोकलच्या फेºया वाढविण्याऐवजी तांत्रिक बिघाड झाल्याने उशीर झाला, हे कारण देऊन मध्य रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकून देतेय. शेवटी सामान्य जनतेला एक म्हण रोज म्हणावी लागते. ‘रोज मरे, त्याला कोण रडे’- गौरव सुर्वे, कांदिवली.लोकसंख्येला अनुरूप लोकलसेवा दिली पाहिजेमुंबईतील लोकलसेवा प्रवाशांना सुविधा देण्यात कमी पडतेय. हे काही वेगळे सांगायला नको. दरवर्षी ऐन पावसाळ्यात प्रवाशांना यामुळे प्रचंड त्रास होतो, परंतु तांत्रिक कारणे देण्याशिवाय प्रशासनाने ठोस असे काहीच केले नाही. त्यामुळे समस्या कमी व्हायच्याऐवजी वाढल्या. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता, रेल्वे प्रशासनाने त्यानुसार सुविधा द्याव्यात. रेल्वेमंत्र्यांनी या समस्यांकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. शेवटी प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, हीच अपेक्षा. - उदय वाघवणकर, जोगेश्वरी.योजनांची अंमलबजावणी करावीपावसाळ्यात लोकल मध्ये होणाºया अपघातांची संख्या दरवर्षी वाढते. प्रत्येक आठवड्यात मेगाब्लॉक घेतले जातात, दुरुस्ती केली जाते. तरी तांत्रिक अडचणी, दरड कोसळणे इत्यादी घटना घडतात. अशा घटनांमुळे जीवितहानी होते. प्रवाशांचे अतोनात हाल होतात, आॅफिसमध्ये लेटमार्क लागतात, या सगळ्याचा परिणाम रेल्वेचा आर्थिक व्यवस्थेवर होतो. रेल्वे व्यवस्थेमध्ये २४ तास सुरक्षा यंत्रणा, पोलीस, वैद्यकीय सुविधा, शिक्षित कर्मचारी, नियमितपणा-आढळून येणे कठीण आहे. लोकल वेळेवर कधीही नसते या कारणाने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. या सगळ्यात मोटरमेनची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. पावसाळ्यात येणाºया अडचणींचा अभ्यास करून योग्य अशा योजना आखल्या गेल्या पाहिजेत व त्या अंमलात आणाव्यात. - मयूरी विचारे, गोरेगाव.रेल्वे प्रशासनाची निर्ढावलेली वृत्तीच जबाबदारलेटलतिफ लोकल सेवेला रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. सरकार कोणाचेही असले, तरी प्रवाशांना प्रशासनाच्या हलगर्जीपणाला सामोरे जावे लागते. आपल्याला काय होणार आहे काहीही नाही, लोकल लेट होऊ दे नाहीतर घसरू दे, मरणार सामान्य प्रवासीच ना, आपल्याला काय पगार, भत्ते मिळतात, शिवाय लोकल उशिराने चालविल्या तरी कोण शिक्षा करणार आहे? इतका आत्मविश्वास या रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये बळावला असेल, तर कोण कशाला प्रवाशांच्या दैन्यावस्थेकडे लक्ष देईल! लोकल, मेल, एक्स्पे्रस चालविण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेण्याची जबाबदारी मोटरमनची असते. लोकल ठप्प पडल्यावर एकामागे एक लोकल उभ्या राहतात. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो, पण तांत्रिंक बिघाड झाल्यास आम्ही काय करणार, असे म्हणून रेल्वे प्रशासनाकडून हात झटकले जातात. जोपर्यंत लोकल उशिरा येण्याची जबाबदारी कोणाची हे निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत रेल्वे प्रवाशांना गृहीत धरण्याची रेल्वे प्रशासनाची निर्ढावलेली वृत्ती कमी होणार नाही. - अनिरुद्ध बर्वे, कल्याणप्रवाशांच्या समस्या विचारात घेणे आवश्यकमुंबईकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाºया लोकलचा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा होत आहे. सातत्याने कोलमडणारे वेळापत्रक, सकाळ-संध्याकाळी रेल्वे स्थानकांवर, लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी यामुळे प्रवास करणे अवघड होत आहे. रेल्वेच्या अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात हे रूळ ओलांडताना होतात. त्यामुळे सर्वप्रथम वाढत्या गर्दीचे नियोजन करायला हवे. गर्दीच्या नियोजनाकरिता सर्व स्थानकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकांदरम्यानची प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे. रेल्वे प्रशासनाने योजना बनविताना प्रवासी संघटना, प्रवासी यांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. अपघात रोखण्यासाठी विशेष समितीची स्थापना करणे गरजेचे आहे. रेल्वेच्या प्रलंबित समस्यांवर प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता, प्रश्न सोडविण्यासाठी सर्वंकष विचार करावा. गजबजलेल्या मुंबईच्या जीवनात वायफायसारख्या नवनवीन सुविधा मुंबईकरांसाठी फायदेशीर नाहीत. त्यापेक्षा रेल्वे प्रवास कसा सुरक्षित, सुरळीत होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- श्वेता टेंभुर्णे, लोकग्राम, कल्याण.मेल, एक्स्प्रेसचा भार लोकल फेºयांवरपश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वे वाहतूक खूप धीम्या गतीने सुरू असते. याचे मुख्य कारण म्हणजे मध्य रेल्वेवर रेल्वेच्या जाळ्यांचा मोठा भार आहे. पश्चिम रेल्वेमधून ठरावीक लोकल जातात. यासह इतर राज्यातील मेल, एक्स्प्रेस जातात. मात्र, त्याचा भार पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलवर होत नाही. मात्र, मध्य रेल्वे मार्गावरून राज्यातील राज्याबाहेरील अनेक मेल, एक्स्प्रेस ये-जा करत असतात. त्यामुळे याचा थेट परिणाम मध्य रेल्वे मार्गावरील लोकलवर होतो. त्यामुळे आता रेल्वेचे वेळापत्रकात बदल करणे आवश्यक आहे.- सुनील रोकडे, विलेपार्ले.लेटलतिफ रेल्वेत सुधारणा व्हावीलेटलतिफ लोकलचे दररोज कोणत्याही कारणाने लोकल खोळंबा होतो. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वेमधील अधिकारी वर्ग निष्काळजीपणे वागत असल्याने लोकलच्या उशिरा येण्यावर कोणताही सकारात्मक बदल होताना दिसून येत नाही. मध्य रेल्वे मार्गावर तब्बल अर्धा तास लोकल उशिराने धावत असतात. त्यामुळे यावर सुधारणा होणे आवश्यक आहे. - कमलाकर जाधव, बोरीवली.रेल्वेमंत्री कोणीही असो, समस्या तशाच
उपनगरीय सेवेतून रेल्वेला सर्वात जास्त महसूल मिळतो. मात्र, प्रवाशांच्या नशिबी मात्र मनस्ताप, वेळेचा अपव्यय, आर्थिक भुर्दंड, शारीरिक व मानसिक त्रास हेच पदरी पडत आहे. रेल्वे विस्कळीत झाली असताना रेल्वेकडून प्रवाशांना कधीच योग्य माहिती आणि मार्गदर्शन दिले जात नाही. मुंबईकरांना कायमच रेल्वे कडुन सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याची भावना मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये आहे आणि त्यातल्या त्यात कल्याण - आसनगाव - कसारा भाग तर कायमच उपेक्षित राहिला आहे. रेल्वेमंत्री कोणीही असो. मात्र, प्रवाशांच्या नशिबाचे भोग काही संपायला तयार नाही. दर रविवारी वा सुट्टीच्या दिवशी मेगाब्लॉक घेतले जातात, तर कधी अचानकपणे रेल्वे मेगाब्लॉक घेते. मात्र, त्याचा रेल्वे सुरळीत चालण्यासाठी काहीही चांगला परिणाम दिसत का नाही, हे अनाकलनीय आहे. आता तर पावसाळा तोंडावर आला आहे, कितीही दावे रेल्वेकडून होत असले, तरी रेल्वेसेवा विस्कळीत होणार हे नक्की आहे. आता रेल्वे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता, प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकारक प्रवास कसा होईल, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. - अनंत बोरसे, शहापूरलोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्षमेगाब्लॉक, जम्बो ब्लॉक, ट्रॅफिक ब्लॉक अशा नावाखाली मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गांवर सातत्याने देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू असतात. तरीही सातत्याने लोकल सेवा विस्कळीत होते. ब्लॉकमधून केली जाणारी मलमपट्टी कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. नव्या रेल्वे मार्गांची निर्मिती, परिपूर्ण आधुनिकीकरण आणि उपनगरी लोकलसेवेचे कुशल व्यवस्थापन याची खरी गरज आहे. प्रवासी वाढल्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकल फेऱ्यांची संख्या १ हजार ७३७ पर्यंत वाढविली. मात्र, विविध कारणांने तीस फेºया रद्द केल्या जातात. ओव्हर हेड वायर तुटण्याच्या घटना अनेक वेळा होतात. त्यामुळे ओव्हर हेड वायर उच्च दर्जाच्या वापरण्यात याव्यात. उपनगरी रेल्वेसेवेला सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांकडे सध्या वेळच नाही. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे दुखणे सहन करण्याशिवाय पर्याय नाही.- मनोहर शेलार, सदस्य, उपनगरी रेल्वे सल्लागार समिती.अद्ययावत यंत्रणेतून समस्या सोडवावारंवार होणारा बिघाड आणि त्यामुळे उशिराने धावणाºया लाकल याबाबत रेल्वे प्रशासननो आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकसह यार्डातील प्रत्येक यंत्रणा, तेथील व्यवस्थापन यांच्याकडेही लक्ष द्यायला हवे. तिकीट किंवा पास काढून प्रवास करणाºया नोकरदार वर्गाने लेटमार्कच्या रूपात आर्थिक भुर्दंड का सोसावा? रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहायला हवे. रेल्वेची जुनाट झालेली यंत्रणा अद्ययावत केली पाहिजे. आपल्या चुकांचा आढावा घेऊन प्रवाशांची सुरक्षा आणि सेवेसाठी त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा विचार हा कामांचा नव्याने आराखडा मांडताना जरूर करायला हवा. रेल्वे कर्मचारी वर्गाला नियमित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. रेल्वेकडून नवनवी तंत्रे व यंत्रे विकसित होत आहेत, त्यांची किंमत जनता देत आहे. त्यांचे मोल सेवा रूपाने परत करण्याची मानसिकता जागविण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली पाहिजे.- स्नेहा राज, गोरेगाव.