Join us

मालगाडीच्या डब्यात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : कसाऱ्याच्या दिशेने जात असलेल्या मालगाडीच्या एका डब्याचे चाक उष्णतेने लालबुंद झाल्याचे लक्षात आल्याने मालगाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शहापूर : कसाऱ्याच्या दिशेने जात असलेल्या मालगाडीच्या एका डब्याचे चाक उष्णतेने लालबुंद झाल्याचे लक्षात आल्याने मालगाडी आटगाव स्थानकावर उभी करण्यात आली. त्यामुळे आज सकाळी आसनगाव आणि कसारादरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. दरम्यान, पॉइंटमनच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

वाहतूक ठप्प झाल्याने सकाळी कसाऱ्याकडे जाणारी लोकल रद्द करून आसनगाव स्थानकातूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे वळविण्यात आली. अचानक लोकल रद्द झाल्यामुळे रात्रपाळी करून कसाऱ्याकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. शिवाय प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, चाक जाम झालेला मालगाडीचा डबा बाजूला काढून मालगाडी पुढे हलविण्यात आली. सुमारे दीड ते दोन तासांच्या खोळंब्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. सकाळी आसनगाव स्थानकातून मालगाडी कसाऱ्याच्या दिशेने जात असताना डब्याचे एक चाक उष्णतेने लाल झाल्याचे श्याम सखाराम या पॉइंटमनने पाहिले. ही बाब त्याने तत्काळ आसनगाव स्टेशन मास्तरांना सांगितली. त्यांनी आटगाव स्थानकाशी संपर्क साधून मालगाडी आटगाव स्थानकावर थांबवली.

मालगाडी थांबवून ठेवल्याने तुळशी, काशी, गीतांजली या लांब पल्ल्याच्या गाड्या सुमारे तासाभरापेक्षा अधिक काळ एका जागी खोळंबून राहिल्या.