मुंबई : उपनगरीय रेल्वेतून प्रवास करताना काही खोळंबा झाल्यास तांत्रिक बिघाड झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते. हाच तांत्रिक बिघाड आता एसटी महामंडळातही होत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सुविधा आहे. मात्र गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता या ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रकिया अचानक बंद झाली. महामंडळाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, 'तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हर डाऊन झाले आहे. तासाभरानंतर पुन्हा ऑनलाइन तिकीट आरक्षण करता येईल, अशी माहिती देण्यक्त आली.देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ओळखले जाते. राज्यात सुमारे 65 लाखाहून जास्त प्रवासी रोज एसटीने प्रवास करतात. महामंडळातील सर्वाधिक भारमान रक्षाबंधन या सणाच्या दिवशी असते, असे एसटी अधिकारी सांगतात. रक्षाबंधणासाठी महामंडळाने सुमारे 2 हजार जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रक्षाबंधनाच्या 24 तासाआधी महामंडळाचे ऑनलाइन तिकीट आरक्षण सर्व्हर ठप्प झाल्यामुळे प्रवाशांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.
आता एसटी महामंडळातही तांत्रिक बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 1:17 AM