मुंबई : एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकातून सकाळी ८.३३ वाजता सुटणारी एसी लोकल तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत जागीच थांबून होती. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची उद्घोषणा केली, पण लोकल सुरू होणार का? की रद्द होणार? याबाबत कोणतीच माहिती दिली जात नसल्याने प्रवासी संभ्रमात होते. त्यात लोकल विरारच्या प्लॅटफॅार्म क्रमांक १ वरुन सुटत असल्यानं लोकल रद्द झाल्सास प्लॅटफॅार्म २ आणि ३ वर संपूर्ण प्लॅटफॅार्म चालावा लागणार या विचारानेच प्रवासी वैतागले होते.
अर्ध्यातासाच्या रखडपट्टीनंतर लोकल सुरू होत असल्याची उद्घोषणा झाली. पण लोकलच्या दरवाजांची उघड-झाप सुरु झाली. नेमकं काय सुरुय हे कळायला काही मार्ग नव्हता. दोन-तीन वेळा दरवाजांची उघड झाप झाल्यानंतर लोकलनं अखेर मार्ग पकडला आणि ८.३३ ची लोकल ९.०५ मिनिटांनी विरार स्थानकातून रवाना झाली. पण या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत असून साध्या लोकलला याचा विनाकारण फटका बसत आहे. एसी लोकल वेळेत रवाना होत नसल्यानं इतर साध्या लोकलला अनावश्यक सिग्नलला सामना करावा लागत आहे.
एसी लोकलमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा एसी यंत्रणा बंद पडणे, स्वयंचलित दरवाजे बंद पडणे अशा घटना घडल्या आहेत. याचा फटका प्रवाशांना सोसावा लागत आहे आणि कामावर लेटमार्कला सामोरं जावं लागत आहे.