मुंबई : लोकलमधील तांत्रिक समस्यांनी सध्या मध्य रेल्वेला चांगलेच ग्रासले आहे. मंगळवारी एका जुन्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, एक तास मध्य रेल्वे मेन लाइन विस्कळीत झाली आणि त्याचा चांगलाच फटका लोकलसेवेला बसला. त्यामुळे ९ लोकल फेऱ्या रद्द झाल्या. लोकलमधील बिघाडाच्या ४८0 पेक्षा जास्त घटना २0१५ मध्ये घडल्या असून, देखभाल-दुरुस्तीचा मोठा प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर आहे. अंबरनाथहून सीएसटीला जाणारी जलद लोकलने मुलुंड सोडताच, त्यामध्ये तांत्रिक समस्या उद्भवण्यास सुरुवात झाली. कांजुरमार्गपर्यंत ही समस्या जाणवू लागल्याने, लोकल घाटकोपर स्थानकात येताच ती थांबवून, त्याची तपासणी करण्यात आली. जादा करंट पास होत असल्याने ओव्हरहेड वायर आणि पेन्टाग्राफमध्ये समतोल राहत नव्हता. त्यामुळे त्यामधून धूर येऊ लागल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास सुरू झालेला लोकलमधील तांत्रिक पेच सोडवण्यास जवळपास एक तास लागला. तोपर्यंत जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. तांत्रिक पेच सोडवल्यानंतर लोकलसेवा पूर्ववत झाल्या. या घटनेचा परिणाम झाल्याने ९ लोकल फेऱ्या रद्द होऊन ४0 फेऱ्या उशिराने धावल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. सकाळच्या सुमारास झालेल्या घटनेमुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. लोकल पकडण्यासाठी स्थानकांवर गर्दीही झाली होती. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेवर पुन्हा तांत्रिक समस्या
By admin | Published: January 06, 2016 1:44 AM