Join us

तंत्रज्ञान प्रगतीतून होणार देश परिवर्तन

By admin | Published: December 26, 2016 6:47 AM

विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्र प्रगतीपथावर आहे. या क्षेत्रांत संशोधन होते. देशात आयटी क्षेत्राने प्रगती केली आहे. पण, अजून प्रगती करण्यास वाव आहे.

मुंबई : विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्र प्रगतीपथावर आहे. या क्षेत्रांत संशोधन होते. देशात आयटी क्षेत्राने प्रगती केली आहे. पण, अजून प्रगती करण्यास वाव आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाल्यास आपोआपच देश परिवर्तन घडणार आहे. आयआयटीयन्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला खूप पुढे नेऊ शकतात. असे झाल्यास देशाची प्रगती होईल. तरुणच देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व आंध्र प्रदेशच्या लोकसत्ता पार्टीचे नेते डॉ. जयप्रकाश नारायण यांनी केले. आयआयटीमध्ये सुरु असलेल्या मूड इंडिगोमध्ये रविवारी डॉ. नारायण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. मूड इंडिगोचे यंदाचे ४६वे वर्ष आहे. गेले नऊ महिने आपला अभ्यास सांभाळून आयआयटीयन्स या महोत्सवाची तयारी करत आहेत. आशियातील सर्वात मोठा कॉलेज महोत्सव अशी ओळख असलेल्या मूड इंडिगोच्या तिसऱ्या दिवशी जमलेल्या तरूणांनी फेस्टिव्हलसोबत नाताळ देखील साजरा केला . आयआयटीच्या कॅम्पसमध्ये नाताळचा मूड दिसून आला. बहुतांश जणांनी लाल रंगाचे कपडे परिधान केले होते. अनेक तरूण लाल रंगाच्या टोप्या घालून आलेले तर काहींनी सांताक्लॉजचा वेष केला होता.मूड आयमध्ये रविवारी सोलो नृत्य स्पर्धा रंगली. ही स्पर्धा पहायला सभागृह खचाखच भरले होते. या स्पर्धेत स्पर्धकांनी शास्त्रीय आणि पाश्चिमात्य अशी दोन्ही प्रकारची नृत्ये सादर केली. वाद्यांशिवाय गाण्याच्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजनही मूड आयमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कोणत्याही वाद्याशिवाय गायकांनी गाणी सादर केली. आयआयटीच्या आवारातील मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेसाठी मैदानावर सर्वांनीच प्रचंड गर्दी केली होती. (प्रतिनिधी)