मुंबई : अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो -७ च्या उन्नत मार्ग व त्यावरील १६ स्थानकांच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आयोजित केलेल्या निविदा पूर्व बैठकीला सुमारे तीस निविदाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक कंपन्यांनी एमएमआरडीएकडे काही प्रश्न उपस्थित केले असून, ते पुढील १५ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन प्राधिकरणाने दिले आहे. एमएमआरडीएने या निविदा ३ पॅकेजेसमध्ये विभागल्या असून यशस्वी कंत्राटदारांनी हे काम ३0 महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. एमएमआरडीएने मेट्रो-७च्या उन्नत मार्ग आणि स्थानकांच्या बांधकामांसाठी गुरुवारी निविदा पूर्व बैठक बोलावली होती. या बैठकीला मे. एच.सी.सी. लि., मे. रिलायन्स इन्फ्रा लि., मे. प्रतिभा इंडस्ट्रीज लि., मे. एल अॅण्ड टी अशा विविध मान्यताप्राप्त कंपन्यांचे प्रतिनिधी निविदा पूर्व अर्हता बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तांत्रिक प्रश्न उपस्थित केले असून, या प्रश्नांचे निराकरण १५ जानेवारीपर्यंत करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मेट्रोच्या पहिल्या पॅकेजमध्ये अंधेरी (पूर्व), शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद आणि न्यू अशोकनगर या पाच स्थानकांच्या व स्थानकांदरम्यानचा मार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. दुसऱ्या पॅकेजमध्ये आरे, दिंडोशी, पठाणवाडी, पुष्पा पार्क, बाणडोंगरी व महिंद्रा आणि महिंद्रा या सहा स्थानकांच्या व स्थानकादरम्यानचा मार्ग बांधण्याचा अंतर्भाव आहे. तसेच तिसऱ्या पॅकेजमध्ये मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा व दहिसर (पूर्व) या स्थानकांच्या व स्थानकांदरम्यानचा मार्ग बांधण्यात येणार आहे.
मेट्रो-७साठी तीस कंपन्या उत्सुक
By admin | Published: January 08, 2016 2:44 AM