वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलीची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:59 AM2017-11-21T01:59:55+5:302017-11-21T01:59:58+5:30
मुंबई : पश्चिम बंगालमधून मुंबईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची नागपाडा पोलिसांनी सुटका केली.
मुंबई : पश्चिम बंगालमधून मुंबईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची नागपाडा पोलिसांनी सुटका केली. कामाठीपुरातील एका खोलीत तिला डांबून ठेवण्यात आले होते. तिची विक्री करणाºया दोघा एजंटचा शोध सुरू आहे. अमिना व अन्वर अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस नियंत्रण कक्षात १३ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने फोन करून, कामाठीपुरातील पेपरवाली चाळ बिल्डिंगमधील ६५ नंबरच्या खोलीमध्ये १४ वर्षांच्या दोघा अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आल्याची माहिती दिली. त्यानुसार, नागपाडा पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक प्रवीण कदम हे दोघा महिला पोलिसांना घेऊन घटनास्थळी गेले असता, त्या ठिकाणी त्यांना ७० वर्षांच्या रेवम्मा गडबळे व राणी (बदललेले नाव) आढळून आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, राणीचे वय १९ असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, ती अल्पवयीन असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर, वरिष्ठ निरीक्षक संजय बस्वत यांच्या सूचनेनुसार तपास अधिकारी उपनिरीक्षक नीलेश कानडे यांनी या प्रकरणाचा तपास केला.
राणीला बंगाली भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा समजत नसल्याने माहिती मिळविण्यात अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी बंगाली समजणाºया इसमामार्फत तिच्याकडून माहिती घेतली असता, ती पश्चिम बंगालमधील इंटिगे कोलवाडी या गावातील असल्याचे स्पष्ट झाले. तिला अमिना व अन्वर यांनी मुंबईत आणले. ८ नोव्हेंबरला रेवम्मा गडबळे या वृद्धेला विकल्याचे स्पष्ट झाले. तिच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधला असता, तिने सांगितलेली माहिती बरोबर असून, वय मात्र १६ वर्षांचे असल्याचे स्पष्ट झाले.