मुंबई : शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून सततच्या लैंगिक छळाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना काल संध्याकाळी भांडुपमध्ये घडली. शेजाऱ्याचे नाव समीर घोगरे (३३) असून त्याला पोलिसांनी अटक केली.भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी १३ वर्षांची असून शाळेत शिकत होती. तिने संध्याकाळी सहाच्या सुमारास जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी आग विझवून या मुलीला प्रथम मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र पुढील उपचारासाठी तिला सायन रुग्णालयात पाठवले. पोलिसांना या मुलीने लिहिलेली सुसाइड नोटही सापडली आहे. या नोटमध्ये मुलीने समीरकडून झालेला अत्याचार लिहिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आईवडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर समीर घरी येत असे व मोबाइलवरील अश्लील क्लीप दाखवून चाळे करत असे. या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती, असा तपशील नोटमध्ये नमूद होता. आरोपी समीर बेरोजगार आणि नशेच्या आहारी गेल्याचे पोलीस सांगतात. त्याच्याविरोधात विनयभंग, बाल अत्याचारविरोधी कायद्यातील कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत धाडले आहे. (प्रतिनिधी)
लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: July 04, 2014 1:12 AM