आदिवासी कृषी समितीचा तहसीलवर मोर्चा
By admin | Published: July 31, 2014 12:25 AM2014-07-31T00:25:40+5:302014-07-31T00:25:40+5:30
पालघर जिल्ह्यातील आदिवासी बचाव कृती समितीने आज पालघर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते
पालघर : आदिवासींची कुठलीही वैशिष्ट्ये धनगर समाजात दिसून येत नसतानाही केवळ आदिवासी जमातीमध्ये सूचित केलेल्या ३६ व्या ‘धनकड’ या जमातीतील नावाच्या साम्याचा फायदा उचलणाऱ्या व त्यांना पाठिंबा देणाऱ्या महायुतीचे प्रमुख नेत्यांच्या विरोधात आदिवासी बचाव कृषी समितीच्या वतीने पालघर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युतीच्या दुटप्पी धोरणांचा निषेध करण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी बचाव कृती समितीने आज पालघर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर उद्देशून केलेल्या भाषणात ज्येष्ठ नेते पांडुरंग पारधी म्हणाले की, सन १९७६ पासून आदिवासींच्या हक्कांवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्यानंतर नव्याने धनगर समाजाचे आदिवासींच्या हक्कांच्या आरक्षणात शिरकाव करु पाहात आहे. याला आमचा विरोध आहे. त्यामुळे धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समावेश करु नये, आदिवासी जमातीसाठी कुठलेही आरक्षण धनगर व मच्छीमार कोळी समाजाला देऊ नये, युती सरकारने काढलेल्या निर्णयानुसार आदिवासींच्या राखीव जागांवर लागलेल्या शासकीय निमशासकीय सेवेत काम करीत असलेल्या बोगस कर्मचाऱ्यांना लागू असलेला १९९५ चा शासन निर्णय रद्द करुन त्यांना सेवेतून काढून टाकावे व त्यांच्या रिक्त जागांवर खऱ्या आदिवासी तरुणांची नियुक्ती करावी. ठाणे जिल्हा विभाजन करुन अनुसूचित क्षेत्राच्या आदिवासी स्वायत्त जिल्हा निर्माण करावा इ. अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी अनेकांनी आपल्या भाषणातून समस्याही मांडल्या. (वार्ताहर)