Join us

नाव ‘तेजस’, पण बाकी सगळा ‘अंधार’, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 8:36 AM

कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील 24 प्रवाशांना रविवारी (15 ऑक्टोबर) ऑम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सामना संपादकीयमधून ताशेरे ओढले आहेत. 

मुंबई - कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील 24 प्रवाशांना रविवारी (15 ऑक्टोबर) ऑम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सामना संपादकीयमधून ताशेरे ओढले आहेत.  नाव ‘तेजस’, पण बाकी सगळा ‘अंधार’ असाच हा उफराटा प्रकार म्हणायला हवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. ''एका बुलेट ट्रेनच्या स्वप्नपूर्तीसाठी १ लाख ८ हजार कोटी खर्च केले जाणार आहेत आणि इकडे ‘तेजस’ एक्प्रेसमधील २४ प्रवाशांवर निकृष्ट नाश्त्यामुळे विषबाधेशी झुंज देण्याची वेळ आली आहे. ‘तेजस’ ही देशातील सर्वात जलद धावणारी एक्प्रेस आहे. तिच्या प्रत्येक डब्याच्या निर्मितीसाठी, त्यातील उच्च दर्जाच्या सेवा-सुविधांसाठी ३ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. त्याच ‘तेजस’मध्ये काही रुपयांचा नाश्ता प्रवाशांना विषबाधा होण्यास कारणीभूत ठरला'', असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?देशात सध्या सुपरफास्ट, अतिसुपरफास्ट आणि बुलेट ट्रेनचे वारे जोरात वाहत असले तरी पायाभूत सेवा, प्रवाशांना द्यायच्या किमान सोयी-सुविधा, त्यांच्या प्राथमिक गरजा आणि सुरक्षा मात्र रेल्वेने वाऱ्यावरच सोडून दिल्या आहेत. गेल्या महिन्यात मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीमध्ये २३ प्रवाशांचा झालेला दुर्दैवी मृत्यू असो, की मुंबईकर लोकल प्रवाशांना वर्षानुवर्षे भोगाव्या लागणाऱ्या यातना असोत. एक्स्प्रेस गाड्यांचा असुरक्षित प्रवास असो, की आता ‘तेजस’सारख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील प्रवाशांना अन्नातून झालेली विषबाधा असो. प्रवाशांच्या प्राथमिक गरजा आणि सुरक्षा यापेक्षा झगमगाट आणि देखावा यालाच महत्त्व दिले जात आहे. आधीच रेल्वे प्रवास म्हणजे सामान्य माणसाने जिवावर उदार होऊन प्रवास करण्यासारखे आहे. दरवर्षी रेल्वे अपघात आणि दुर्घटनांमध्ये आपल्या देशात सुमारे २० ते २५ हजार प्रवाशांचे बळी जातात. जुने रेल्वेमार्ग, त्यावरील धोकादायक पूल, जुनाट सिग्नल यंत्रणा, रखडलेले आधुनिकीकरण असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे तसेच रेंगाळलेले आहेत. रेल्वेची ‘खानपान सेवा’ हा तर नेहमीचतक्रारीचा विषय राहिला आहे. त्याच्या निकृष्ट दर्जाबद्दल आणि घाणेरड्या सेवेबाबत प्रवाशांनी तक्रारी करण्याचेही आता सोडून दिले आहे. ‘तेजस’मध्ये रविवारी याच खानपान सेवेचा ‘जीवघेणा’ अनुभव २४ प्रवाशांना आला. करमाळी येथून मुंबईला प्रवास सुरू झाल्यावर गाडीत जो ऑम्लेट-पाव आणि कटलेटचा नाश्ता प्रवाशांना देण्यात आला, तोच या प्रवाशांसाठी ‘विषाची परीक्षा’ ठरला. सध्या त्यांच्यावर चिपळूण येथे उपचार सुरू आहेत. आता नेहमीप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. चौकशीचा फार्सदेखील करण्यात येईल, पण विमानाप्रमाणे उत्कृष्ट सोयी-सुविधा असणाऱ्या ‘तेजस’मध्ये निकृष्ट आणि विषबाधा होईल असे अन्नपदार्थ प्रवाशांना दिलेच कसे गेले? गेल्या वर्षी ‘कॅग’ने रेल्वेमध्ये मिळणारे अन्न, त्याचा दर्जा आणि तेथील स्वच्छता याबाबत कडक ताशेरे ओढले होते. मात्र त्यानंतरही कधी कोलकाता-दिल्ली पूर्वा एक्प्रेसमध्ये बिर्याणीमध्ये पाल सापडते, नवी दिल्ली-सेल्दाह राजधानी एक्प्रेसमधील जेवण खाल्ल्यानंतर काही प्रवासी आजारी पडतात आणि आता ‘तेजस’मधील प्रवाशांना विषबाधा होते. लोकांच्या जिवावर उठणारे असे प्रकार सुरूच आहेत. याआधीच्या रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे कॅटरिंग सेवेत सुधारणा करण्याचे, स्वच्छ आणि

दर्जेदार जेवण देण्याचे आश्वासन दिले होते. ‘रेल्वे कॅटरिंग धोरण-२०१७’अन्वये स्वच्छ, सुरक्षित आणि अत्याधुनिक स्वयंपाकघरात अन्न शिजवले जाईल असे सांगण्यात आले होते. ‘तेजस’मधील विषबाधा प्रकरणाने या आश्वासनाचे बुडबुडे हवेतच विरल्याचे सिद्ध केले आहे. साधा एक नाश्ता व्यवस्थित आणि दर्जेदार दिला जात नाही आणि दर दोन तासाला प्रवाशांना ताजे अन्न पुरविण्याच्या बाता रेल्वे प्रशासन कुठल्या तोंडाने मारते? हिंदुस्थानी रेल्वे रोज ११ लाख लोकांना भोजन पुरवते असे रेल्वेने अभिमानाने सांगायला काहीच हरकत नाही, पण त्या भोजनातून विषबाधा होणार नाही याची काळजीही मग घ्यायला हवी. एका बुलेट ट्रेनच्या स्वप्नपूर्तीसाठी १ लाख ८ हजार कोटी खर्च केले जाणार आहेत आणि इकडे ‘तेजस’ एक्प्रेसमधील  २४ प्रवाशांवर निकृष्ट नाश्त्यामुळे विषबाधेशी झुंज देण्याची वेळ आली आहे. ‘तेजस’ ही देशातील सर्वात जलद धावणारी एक्प्रेस आहे. तिच्या प्रत्येक डब्याच्या निर्मितीसाठी, त्यातील उच्च दर्जाच्या सेवा-सुविधांसाठी ३ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. त्याच ‘तेजस’मध्ये काही रुपयांचा नाश्ता प्रवाशांना विषबाधा होण्यास कारणीभूत ठरला. नाव ‘तेजस’, पण बाकी सगळा ‘अंधार’ असाच हा उफराटा प्रकार म्हणायला हवा.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपानरेंद्र मोदीबुलेट ट्रेन