Join us

पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून धावणार पहिली खासगी तेजस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 3:43 AM

रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने ही दुसरी खासगी एक्स्प्रेस धावणार आहे

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली खासगी तत्त्वावरील तेजस एक्स्प्रेस १७ जानेवारी रोजी अहमदाबादवरून धावेल. ही एक्स्प्रेस अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान धावणार आहे.

रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने ही दुसरी खासगी एक्स्प्रेस धावणार आहे. दिल्ली ते लखनऊ तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी गाडी ४ आॅक्टोबर २०१९ रोजी धावली होती. त्यानंतर आता मुंबई-अहमदाबाद ही तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. खासगी तेजस एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुंदरी आणि रेल्वे कर्मचारी हे गुजराती वेशभूषेत दिसणार आहेत. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरकडून ही वेशभूषा तयार करून घेण्यात आली आहे.

तसेच तेजस एक्स्प्रेसमध्ये महाराष्ट्रीय आणि गुजराती थाळी मिळणार आहे. यामध्ये गुजराती डाळ, गुजराती कढी, लसनिया बटाटा भाजी, फाफडा, जिलेबी असे गुजराती पदार्थ मिळणार आहेत. तसेच मांसाहारी पदार्थांसह बटाटा भाजी, बटाटावडा, कोथिंबिर वडी, श्रीखंड, कांदेपोहे अशा महाराष्ट्रीय पदार्थांची चवही चाखता येणार आहे.‘एसी डबल डेकर प्रवाशांसाठी गैरसोयीची’पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई ते अहमदाबाद एसी डबल डेकर प्रवाशांसाठी गैरसोयीची आहे. प्रवाशांना आपले साहित्य ठेवण्यास आणि बसण्यास अडचणी येत आहेत.

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणारी डबल डेकर एक्स्प्रेसची रचना इतर एक्स्प्रेसच्या तुलनेत वेगळी आहे. या गाडीला वर-खाली आसने असल्यामुळे उभे राहण्यास प्रवाशांना अडचणी येतात. यासह प्रवाशांना साहित्य ठेवण्यासाठी अरुंद रेक आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद एसी डबल डेकरमधून प्रवास करताना झटके लागतात. या गाडीला एलएचबी डबे लावण्याची मागणी प्रवाशांनी केली. मुंबई आणि गुजरातच्या प्रवाशांसाठी एसी डबल डेकर एक्स्प्रेस खूप उपयुक्त आहे. या गाडीमध्ये प्रवासी क्षमता अधिक आहे. यासह प्रवाशांची संख्याही खूप मोठी आहे. मात्र प्रवाशांना सामान ठेवण्याची जागा खूप कमी असल्यामुळे अनेक अडचणी येतात. रेल्वे प्रशासनाने यात सुधारणा केली पाहिजे, असे रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :तेजस एक्स्प्रेसपश्चिम रेल्वे