Join us

महिलांसाठी मुंबईत धावली ‘बेस्ट’ची पहिली ‘तेजस्विनी’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 3:23 AM

बेस्ट उपक्रमाची महिला विशेष बस सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) दरम्यान विशेष १ या बसमार्गावर गुरुवारी धावली.

मुंबई : बेस्ट उपक्रमाची महिला विशेष बस सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) दरम्यान विशेष १ या बसमार्गावर गुरुवारी धावली. सकाळी ८.०५ ते ११.३० आणि दुपारी ४.३० ते रात्री ८ या वेळेत दर सात मिनिटांनी ही बस चालविण्यात येणार आहे. अशा ३७ ‘तेजस्विनी’ बसगाड्या महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी देणार आहेत. यापैकी सहा बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.बेस्ट उपक्रमामार्फत अशी महिला विशेष डबलडेकर बस सेवा याच मार्गावर सुरू आहे. गेल्या काही काळात महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. दररोज बसगाडीतून प्रवास करणाऱ्या ३३ लाख प्रवाशांमध्ये सात लाख महिला प्रवासी आहेत. या प्रवाशांना तेजस्विनीचा दिलासा मिळणार आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात सहा तेजस्विनी बसगाड्या आल्या आहेत. दहा बसगाड्या प्रादेशिक वाहतूक कार्यालयात नोंदणीसाठी आहेत.या बसगाडीमध्ये ३५ आसन व्यवस्था असून त्या विनावातानुकूलित आहेत. जयपूरमध्ये तयार करण्यात आलेल्या अशा एका बसची किंमत २९.५ लाख रुपये आहे. तेजस्विनी योजनेंतर्गत बेस्ट उपक्रमाला केंद्राकडून ११ कोटींचे अनुदान मिळणार आहे. नवी मुंबई महापालिकेमार्फत अशा दहा बसगाड्या मार्च २०१८ पासून सुरू करण्यात आल्या आहेत. स. ८.०५ ते ११.३० आणि दु. ४.३० ते रात्री ८ या वेळेत दर सात मिनिटांनी ही बस चालविण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईबेस्ट