Join us

'सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही'; के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 16:37 IST

उद्धव ठाकरेंनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. 

मुंबई: विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. के. चंद्रशेखर राव आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. तसेच उद्धव ठाकरेंनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. 

उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद झाला. उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयावर एकमत असल्याची माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली. तसेच परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचं एक मत असल्याचं देखील के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. आमच्या भेटीत लपवाछपवीसारखं काहीच नाही. सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव आणि इतरांनी मुंबईतील बैठक संपल्यानंतर फोटोसाठी पोझ दिली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते.

दरम्यान, केसीआर यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपला देशातून हद्दपार करा अन्यथा देश उद्ध्वस्त होईल, असं वक्तव्य केलं आहे. भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. भाजपच्या विरोधात विविध विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केसीआर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांना भेटण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेतेलंगणामहाराष्ट्रभाजपा