Join us

तेलंगणाचे स्त्रीसौंदर्य कॅनव्हासवर; चित्रकार कप्पारी किशन यांचे प्रदर्शन

By स्नेहा मोरे | Published: March 27, 2024 7:15 PM

कप्पारी किशन यांनी चित्रकलेचे शिक्षण व्हिज्युअल आर्ट या विषयात पूर्ण केले आहे.

मुंबई - चित्रकार कप्पारी किशन यांचे तेलंगणातील स्त्रियांचे जीवनमान , तेथील समृद्ध संस्कृती , स्त्रियांचे भावविश्व यांचे चित्रमय गुंफण करणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तेलंगणाच्या समृद्ध संस्कृतीचा आणि लोकजीवनाचा चित्रात्मक परिचय करून घेण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन कला रसिकांसाठी ३१ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहील.

या प्रदर्शनात कप्पारी किशन यांच्या भाव विश्वातील स्त्रीचे सुरेख दर्शन होते. हे प्रदर्शन म्हणजे केवळ रंग आणि रेषा यांचा अद्भुतरम्य खेळ नसून तेलंगणाच्या समृद्ध संस्कृतीचा दृश्य विश्वकोश आहे. कप्पारी यांच्या चित्रात प्रामुख्याने पाठमोरी स्त्री पाहायला मिळते. स्त्री पाठमोरी असली तरी तिचे सौंदर्य चित्रांमधून खुलून येते. या कलाकृतींमधील स्त्री केवळ सुंदर नाही तर खंबीर आहे. तिची खंबीरता चित्रकाराने रंगाच्या सूचक वापरामधून आणि भक्कम आकारामधून दाखवून दिली आहे, हे या चित्रांचे वैशिष्टय आहे. तेजस्वी रंगांचा उत्फुल्ल वापर, मानवी देह आणि प्राणी देह यांचे अचूक चित्रण , अवकाशाचा योग्य आणि नाट्यमय वापर ही प्रदर्शनाची खासियत आहे.

कप्पारी किशन यांनी चित्रकलेचे शिक्षण व्हिज्युअल आर्ट या विषयात पूर्ण केले आहे. तेलंगणा शासनाचे कला प्रशिक्षक म्हणून ते काम करतात. त्यांना चित्रकला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी, कप्पारी किशन यांनी अनेक एकल - समूह चित्र प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. त्यांची चित्र प्रदर्शने दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैद्राबाद, बंगरुळू, चेन्नई, धर्मशाळा या शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे, फ्रान्स येथे 'सिम्पोसिएम' या चित्र प्रदर्शनात त्यांनी सहभाग नोंदवला होता. जपान, यूएसए, युके, मलेशिया, दुबई, कॅनडा येथील कला संग्रहकांच्या संग्रहात कप्पारी किशन यांची चित्रे समाविष्ट आहेत.