कोरोना काळात दूरसंचार क्षेत्राचे जाळे विस्तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:13+5:302021-06-21T04:06:13+5:30

मार्च महिन्यात जोडले १३.३० दशलक्ष नवे ग्राहक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एरवी नेटवर्कच्या समस्यांमुळे ग्राहकांचा रोष सहन कराव्या ...

The telecommunications sector expanded during the Corona period | कोरोना काळात दूरसंचार क्षेत्राचे जाळे विस्तारले

कोरोना काळात दूरसंचार क्षेत्राचे जाळे विस्तारले

Next

मार्च महिन्यात जोडले १३.३० दशलक्ष नवे ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एरवी नेटवर्कच्या समस्यांमुळे ग्राहकांचा रोष सहन कराव्या लागणाऱ्या दूरसंचार क्षेत्राला कोरोना काळात मात्र ‘फुल्ल नेटवर्क’ मिळाले. मार्च महिन्यात तब्बल १३.३० दशलक्ष नवे ग्राहक जोडून या क्षेत्राने आपले जाळे आणखी विस्तारले आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात देशातील टेलिफोन वापरकर्त्यांची संख्या ११८७.९० दशलक्ष इतकी होती. मार्चमध्ये त्यात १३.३० दशलक्ष ग्राहकांची भर पडून एकूण संख्या १२०१.२० दशलक्षांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ग्राहक वृद्धीदर शहराच्या तुलनेत अधिक आहे.

मार्चमध्ये ग्रामीण भागातील ग्राहक संख्या ७.२४ दशलक्ष, तर शहरी ग्राहक ६.०६ दशलक्षांनी वाढले आहेत. ग्रामीण ग्राहक वृद्धीदर १३.३७ टक्के, तर शहरांचा वृद्धीदर ०.९२ टक्के नोंदविण्यात आला आहे. एकूण वापरकर्त्यांचा विचार करता शहरांचा हिस्सा ५५.२६ टक्के, तर ग्रामीण भागाचा हिस्सा ४४.७४ टक्के इतका असल्याचे ‘ट्राय’च्या अहवालातून समोर आले आहे.

लॅण्डलाईन सेवा प्रदात्यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. मार्चचा विचार करता देशभरात वायरलाईन वापरकर्त्यांची संख्या केवळ ०.०५ दशलक्षांनी वाढली आहे. या सेवेचा वृद्धीदरही दूरसंचार क्षेत्राच्या चिंतेत भर टाकणारा आहे. शहरांत ०.५३ टक्के, तर ग्रामीण भागात लॅण्डलाईन ग्राहक वृद्धीदर वजा २.६० टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.

* ...म्हणून ग्रामीण भागातील ग्राहक वाढले

देशभरात काेराेनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने मार्च महिन्यात मजूर आणि श्रमिकांनी गावची वाट धरली. क्षेत्रबदल झाल्यानंतर रोमिंग लागू होत असल्याने गावी पोहोचलेल्या या कामगारांना नवीन सीमकार्ड खरेदी करावे लागले. त्यामुळे दूरसंचार क्षेत्राचा ग्रामीण ग्राहक वृद्धीदर शहरांच्या तुलनेत वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले.

शहरांतील ग्राहक ठराविक कालमर्यादेनंतर सेवाप्रदाते बदलत असतात. त्यामुळे त्यांच्या संख्येतही वाढ दिसून येईल, असेही सांगण्यात आले.

* देशातील टेलिफोन वापरकर्ते (दशलक्ष)

विभाग..... मोबाईल...... लॅण्डलाईन..... एकूण

शहरी..... ६४५.२०...... १८.५७........ ६६३.७७

ग्रामीण..... ५३५.७५...... १.६७...... ५३७.४२

...................................................................

Web Title: The telecommunications sector expanded during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.